महापालिकेच्या केईएम रुग्णालयात मंगळवारी रात्री एका निवासी डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या संकेत विचारे (२८) या पोलीस हवालदाराला भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या आईवर उपचार न करता  हा डॉक्टर सहकाऱ्यांसमवेत गप्पा मारत बसल्यावरून संकेतने त्या डॉक्टरला मारहाण केल्याचे सांगण्यात येते.
आईच्या पायाला फ्रॅक्चर झाल्यावरून संकेत रुग्णालयात आला होता. केसपेपर काढून तो डॉ. कनानी यांना भेटला आणि उपचाराची विनंती त्याने केली. आपण सहकाऱ्यांशी बोलत असून थोडा वेळ थांबा, असे डॉक्टरांनी संकेतला सांगितले. त्यानंतर दोघांत बोलाचाली होऊन हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते. डॉ. कनानी यांनी तक्रार केल्यानंतर भोईवाडा पोलिसांनी संकेतला अटक केली.