पोलिसांवरील कामाचा वाढता ताण आणि यातून होणाऱ्या आपापसातील वादाच्या प्रकारांनी शनिवारी वाकोला पोलीस ठाण्यात धक्कादायक कळस गाठला. न सांगता घेतलेल्या रजेची नोंद पोलीस ठाण्यातील डायरीत केल्याने संतापलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिर्के यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जोशी व त्यांचे ऑर्डर्ली बाळासाहेब अहेर यांच्यावर गोळ्या झाडून नंतर आत्महत्या केली. जोशी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शिर्के यांचा स्वभाव तापट होता, असे समजते. ते दोन-तीन महिन्यांनी निवृत्त होणार होते. त्यांना दोन मुले आणि मुलगी आहे.  पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट दिली.  
काय घडलं?
* दिलीप शिर्के यांनी शुक्रवारी न सांगता सुटी घेतली. या प्रकाराची नोंद रात्रपाळीच्या पोलीस निरीक्षकाने डायरीत केली.
* शनिवारी कामावर आल्यावर शिर्के यांना ही गोष्ट कळताच त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जोशी यांना जाब विचारला. त्यातून दोघांमध्ये जोरदार खडाजंगी.
* जोशी घरी जायला निघताच शिर्के यांनी त्यांच्यावर गोळी झाडली. गोळी हाताला लागताच ते खाली कोसळले. ते उठण्याच्या प्रयत्नात असताच शिर्के यांनी झाडलेली दुसरी गोळी शरीरातून आरपार गेली.
* गोळय़ांचा आवाज ऐकून ऑडर्ली अहेर यांनी धाव घेतली तेव्हा त्यांनाही एक गोळी लागली.
* यानंतर शिर्के यांनी डोक्यावर गोळी झाडून घेतली.