नवी मुंबईतील वाशी सेक्टर १७ या गजबजलेल्या परिसरातील एका इमारतीतील घरात भरदिवसा दरोडा पडला. दिवाळीची भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने घरात शिरलेल्या एका महिलेपाठोपाठ चार जणांनी घूसखोरी करत शस्त्रांच्या धाकाने घरातील कोटय़वधीची रोकड लुटली. दिवसाढवळय़ा घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. पण पोलिसांनी या दरोडय़ातील आरोपींना बेडय़ा घातल्या तेव्हा त्यातील सूत्रधार कोण, हे समजताच सारेच आवाक झाले.

दिवाळीत अनेक भेटवस्तूंचे आदानप्रदान होत असते. यातील काही भेटवस्तूचे दिवाळीनंतरही वाटप केले जाते. वाशी सेक्टर १७ मधील उच्चभ्रू लोकवस्तीत राहणारे भाजी व्यापारी अरुण मेनकुदळे यांच्या घरी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात दुपारच्या वेळेस तरुण व तरुणी भेटवस्तू घेऊन आल्या. घरात त्यावेळी मेनकुदळे यांची आई आणि मुलगी होती. दरवाजाची बेल वाजवून त्यांनी भेटवस्तू दिल्या. त्यावेळी तरुणीच्या तोंडावर रुमाल गुंडाळला गेला होता. भेटवस्तू दिल्यानंतर या गुन्हेगारांनी पिण्यास पाणी मागितले. पाणी आणण्यास मेनकुदळे यांची मुलगी स्वयंपाक घरात गेली असता जवळच्या जिन्यावर लपून बसलेले चार जण एकापाठोपाठ आतमध्ये घुसले. त्यांनी मेनकुदळे यांच्या आई व मुलीला खुर्चीला बांधून ठेवले. आरडाओरड करू नये

म्हणून चॉपर आणि रिव्हॉल्वरचा धाक दाखविला. मेनकुदळे यांच्या घरात व्यापारासाठी आणलेले रोख दोन करोड नऊ लाख रुपये होते. ते सर्व पैसे केवळ पंधरा मिनिटात बॅगेत भरून या दरोडेखोरांनी पोबारा केला.

भरदिवसा पडलेल्या दरोडय़ाने संपूर्ण नवी मुंबई हादरून गेली. नवी मुंबईचे सहपोलीस आयुक्त प्रशांत बुरडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथके स्थापन करण्यात आली. मेनकुदळे राहात असलेल्या कुसुम सोसायटीतील त्यांच्या घराजवळचा सीसी टीव्ही कॅमेरा आदल्या दिवशीच दुरुस्त करून घेण्यात आला होता. त्यामुळे दरोडेखोरांच्या छबी त्यात कॅमेराबद्ध झाल्या होत्या. या गुन्ह्य़ातील पहिली आरोपी अनिता म्हसाणे ही खारघरला राहणारी आहे. मेनकुदळे यांच्या घरी तिचे येणे-जाणे असल्याने त्यांच्याकडे रोख रक्कम असल्याची टीप या महिलेने दिली होती. विशेष म्हणजे या महिलेचा पती नवी मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल असून पत्नीच्या या उपद्व्यापाविषयी त्याला थांगपत्ताही नाही. हा सुगावा लागल्यानंतर पोलिसांनी सर्वप्रथम या महिलेला खारघरमधून अटक केली आणि त्यानंतर गुन्ह्य़ाची एक एक साखळी उलगडत गेली.

पोलिसांनी तपासासाठी वेगवेगळी दोन पथके आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी रवाना केली. सात दरोडेखोरांनी पैशांची समान वाटणी करून नवी मुंबई सोडली होती. मोबाइल संभाषणामुळे या दरोडेखोरांचा ठावठिकाणा लागण्यास पोलिसांना मदत झाली. वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी या गुन्ह्य़ाची उकल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी ठाणे येथील वाघबीळ येथे राहणारा परंतु उत्तर भारतात पळून गेलेल्या शंकर तेलंगे याला अटक करून आणले. या सर्व गुन्हय़ात सात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक कोटी पर्यंत रोख रक्कम जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्य़ात आणखी तीन आरोपींच्या पोलीस शोधात आहेत. केवळ एक भेटवस्तू मेनकुदळे यांच्या कुटुंबाच्या जिवावर बेतणारी ठरली. बाहेरील व्यक्तीसमोर करण्यात आलेले पैशाचे व्यवहारही या गुन्ह्य़ाला कारणीभूत आहेत.