धूम्रपान केल्याने होणाऱ्या आजाराने धूम्रपान न करणाऱ्यांनाही ग्रासले

शैलजा तिवले, मुंबई</strong>

मुंबईतील बांधकामे, वाहनांची गर्दी, कारखाने आदी कारणांमुळे हवेचा दर्जा दिवसेंदिवस घसरत असल्याने फुप्फुसांचे आजार वाढत आहेत. यामध्ये प्रामुख्याने काळा दमा म्हणजेच सीओपीडीचे (क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसिज) प्रमाण वाढत आहे. धूम्रपान करणाऱ्यांमध्ये मुख्यत्वे हा आजार आढळतो. मात्र प्रदूषित हवेमुळे आता धूम्रपान न करणाऱ्यांना व्यक्तींनाही या आजाराची बाधा होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

हवेतील विशिष्ट प्रकारचे घातक कण श्वासावाटे शरीरात जातात. त्यामुळे फुप्फुसावर दुष्परिणाम होतो आणि सीओपीडी हा आजार जडतो. देशातील एकूण रुग्णांपैकी जवळपास एकतृतियांश रुग्णांना धूम्रपानामुळे हा आजार होतो. या व्यतिरिक्त इंधन ज्वलनातून निर्माण होणारा धूर आणि प्रदूषित हवा हीदेखील या आजारामागची कारणे आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये शहरात धूम्रपान न करणाऱ्या रुग्णांमध्येही सीओपीडी आढळून येत आहे. सध्या सीओपीडीच्या तक्रारी घेऊन येणारे जवळपास ४० टक्के रुग्ण हे धूम्रपान न करणारे आहेत. वाढलेले हवेचे प्रदूषण हेच सीओपीडीच्या वाढण्याचे एक प्रमुख कारण असल्याचे मत फुप्फुसरोगतज्ज्ञ डॉ. विकास ओसवाल यांनी व्यक्त केले. सीओपीडीप्रमाणेच दम्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. पूर्वी या रुग्णांना हिवाळ्यातच अधिक त्रास होत असे. परंतु आता प्रदूषणामुळे वर्षांतून तीन ते चार वेळा दम्याचा त्रास बळावत असल्याचेही डॉ. ओसवाल यांनी सांगितले.

वाढत्या प्रदूषणामुळे सीओपीडी, दम लागणे, वारंवार खोकला येणे हे आजार नक्कीच बळावत आहेत. बाहेरील प्रदूषणासोबतच घरातील प्रदूषणही हे आजार वाढण्यास कारणीभूत आहे. घरांच्या बंद खिडक्या, डासांपासून बचावासाठी लावल्या जाणाऱ्या अगरबत्त्या यामुळेही शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाल्याचे फुप्फुसविकारतज्ज्ञ डॉ. अरविंद काटे व्यक्त करतात.

दिवसाला चार ते पाच वेळा धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीमध्ये साधारणपणे दहा वर्षांनंतर खोकला येणे, दम लागणे ही सीओपीडीची सुरुवातीची लक्षणे दिसू लागतात. परंतु धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींमध्ये मात्र ते कोणत्या प्रकारच्या दूषित वातावरणात अधिक काळ राहतात, यावरही लक्षणे ठरतात. उदाहरणार्थ बांधकामे सुरू असलेल्या भागांत घरामध्ये २४ तास असणाऱ्या महिलेला आठ ते दहा वर्षांतच श्वसनाचे त्रास जाणवू लागतात, असेही डॉ. काटे यांनी सांगितले.

चेंबूरमध्ये रुग्ण सर्वाधिक 

शहरातील ज्या भागांमध्ये हवा प्रदूषित करणाची क्षमता अधिक असणारे (एसपीएम) घनरूप कणांचे प्रमाण वाढले आहे अशा ठिकाणी खोकला, दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशा तक्रारी अधिक असल्याचे केईएम रुग्णालयाच्या संशोधनामध्ये सिद्ध झाले आहे. केईएम रुग्णालयाच्या श्वसनविकार विभागाच्या प्रमुख डॉ. अमिता आठवले या संशोधनातील मुख्य संशोधक असून त्या सांगतात, चेंबूर भागातील मरावली भागामध्ये सर्वाधिक एसपीएम आढळले असून, श्वसनविकारग्रस्तही अधिक आहेत. एसपीएमचे प्रमाण २०० ते ४०० असलेल्या भागांत १०.६ टक्के रुग्णांना खोकल्याचा त्रास होत असल्याचे दिसते. तर एसपीएमचे प्रमाण ५०० हून अधिक असलेल्या भागांमध्ये खोकल्याचे ४०.६ टक्के रुग्ण आढळले. शहरामध्ये बांधकाम, वाहनांमधून निघणारा धूर, कबुतरांमुळे होणारा संसर्ग यावर नियंत्रण ठेवणाऱ्या पर्यायांचा विचार होणे गरजेचे आहे.

शहरात वावरतानाची काळजी

’ बांधकामाच्या ठिकाणी राहात असल्यास दिवसा शक्यतो घराच्या खिडक्या बंद ठेवाव्यात.

’ शहरात प्रवास करताना नाकातोंडाला मास्क लावावा.

’ कबुतरांचा वावर असल्यास संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्या

’ धूम्रपान बंद करा आणि इतरांपर्यंत धूर पोहोचणार नाही, याची काळजी घ्या.

’ घरामध्ये हवा खेळती राहील अशा रीतीने खिडक्यांची रचना करा.

’ स्वयंपाक करताना शक्यतो किचनमधील हवा बाहेर फेकणाऱ्या पंख्याचा वापर करा