07 August 2020

News Flash

दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या प्रती आता ई-मेलवर

उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करणे, त्या उपलब्ध करून देण्याचे पर्याय याबाबत राज्यमंडळाकडून चाचपणी

(संग्रहित छायाचित्र)

दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना माहिती अधिकारांतर्गत देण्यात येणाऱ्या उत्तरपत्रिका यंदा ई-मेलच्या माध्यमातून मिळणार आहेत. उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करणे, त्या उपलब्ध करून देण्याचे पर्याय याबाबत राज्यमंडळाकडून चाचपणी करण्यात येत आहे.

माहिती अधिकार कायद्यानुसार विद्यार्थ्यांनी त्यांच्या उत्तरपत्रिका मागितल्यास त्या उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. दरवर्षी दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर हजारो विद्यार्थी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती घेण्यासाठी अर्ज करतात. यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचा ऑनलाइन निकाल जाहीर केल्यानंतर त्यांचे पुनर्मूल्यांकन, छायाप्रतींसाठीचे अर्ज घेणे, छायाप्रती देणे याबाबत प्रश्न निर्माण झाले. त्यावर आता यंदा छायाप्रती ई-मेलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा पर्याय राज्यमंडळाच्या विचाराधीन आहे.

दरवर्षी छायाप्रती वेळेवर मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल लांबतात. त्याचा परिणाम त्यांच्या पुढील प्रवेश प्रक्रियेवर होतो. यंदाची अनिश्चित परिस्थिती, लांबलेले शैक्षणिक वर्ष यांमध्ये पुनर्मूल्यांकनाचे निकाल उशिरा मिळाल्यास विद्यार्थ्यांचे अधिकच नुकसान होणार आहे. त्यासाठी उत्तरपत्रिकेची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका स्कॅन करून विद्यार्थ्यांना पाठवण्याच्या पर्यायाचा विचार सुरू आहे. त्यासाठीचे अर्जही ऑनलाइन भरण्याचा पर्याय देण्यासाठी मंडळ प्रयत्न करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

यंदापासून ऑनलाइन विषयांचे पुनर्मूल्यांकन

दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेच्या विषयांचे पुनर्मूल्यांकन करण्यात येत होते. यंदापासून ऑनलाइन विषयांचे पुनर्मूल्यांकनही करण्यात येणार आहे. दहावी आणि बारावी या परीक्षांना जवळपास २५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसतात. त्यातील हजारो विद्यार्थी छायाप्रतीसाठी अर्ज करतात. त्यांच्या उत्तरपत्रिका शोधून त्या स्कॅन करण्याचे आव्हान मात्र मंडळाला पेलावे लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 12:52 am

Web Title: copies of 10th 12th answer sheets are now on e mail abn 97
Next Stories
1 दोन किलोमीटरची अट मागे घेण्याबाबत पोलिसांचे मौन
2 जप्त वाहने सोडवताना हाल!
3 मुंबई, ठाण्यात दमदार
Just Now!
X