प्रीती राठी या तरुणीवर वांद्रे स्थानकात झालेल्या अॅसिड हल्ला प्रकरणात वांद्रे रेल्वे पोलिसांनी हरियाणातून एका तरुणाला अटक केली आहे. पवनसिंग गेहलोत (२४) असे त्याचे नाव असून तो प्रीतीच्या परिचयाचा आहे. याच प्रकरणात सत्यम नावाच्या आणखी एका तरुणाला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले असून त्याला शुक्रवारी मुंबईत आणले जाणार आहे.
दिल्लीहून गरीबरथ एक्स्प्रेसमधून वांद्रे स्थानकात आलेल्या प्रीतीवर ३ मे रोजी वांद्रे स्थानकात अज्ञात तरुणाने अॅसिड फेकले होते. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रीतीवर भायखळ्याच्या मसिना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वांद्रे रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी हरियाणातून पवन आझाद सिंग गेहलोत (२४) या तरुणाला अटक केली. त्याला गुरुवारी रात्री मुंबईत आणण्यात आले. त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती रेल्वेचे उपायुक्त शिरसाट यांनी दिली.
पवन हा मूळ हरियाणाचा असून तो प्रीतीचा दूरचा नातेवाईक असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. यापूर्वी त्याने प्रीतीला लग्नासाठी प्रस्ताव पाठविल्याची माहिती समोर आली आहे. अॅसिड फेकणाऱ्या हल्लेखोर तरुणाचे रेखाचित्र आणि सीसीटीव्हीमधील फुटेजमध्ये तरुणाशी पवनचा चेहरा मिळताजुळता असल्याचे पोलिसांनी सांगितले. दिल्लीतून गरीबरथमध्ये बसण्यापूर्वी पवनला प्रीतीने दिल्ली स्थानकात पाहिले होते. प्रीती आणि पवन एकमेकांच्या चांगल्या परिचयाचे होते, अशी माहितीही समोर आली आहे. याच प्रकरणात पोलिसांनी सत्यम नावाच्या आणखी एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला शुक्रवारी मुंबईत आणले जाणार आहे. पवनला उद्या न्यायालयात हजर केले जाणार असून त्यानंतरच या प्रकरणावर अधिक प्रकाश पडेल असे पोलिसांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 10, 2013 4:31 am