मोठमोठय़ा मोहिमांची आखणी करुनही ठाणे-कल्याणात सक्रिय असलेल्या सोनसाखळी चोरांना पायबंद घालण्यात पूर्णत: अपयशी ठरलेल्या पोलिसांनी आता महिला वर्गालाच बनावट दागिने घालून आपला बचाव करण्याचे सल्ले देण्यास सुरुवात केली आहे.
एखाद्या सोहळ्यासाठी नटून-थटून, दागिन्यांचा साज चढवून तुम्ही घराबाहेर पडत असाल, तर सावधान…तुमच्या मागावर असलेल्या चोरांना चकवा देण्यासाठी बनावट दागिने परिधान करा, असे अजब आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे. साज-श्रृंगार करायचा असेलच तर तो समारंभाच्या ठिकाणी जाऊन करा, असेही त्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी खरे दागिने पेटीत आणि खोटे दागिने गळ्यात घालून चोरांना चकवा देण्याची क्लृप्ती महिलांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे. असे सल्ले देऊन चोरांना पकडण्यात आपण हतबल असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षरीत्या मान्य केले आहे.
ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातला आहे.  मधल्या काळात सोनसाखळी चोरांचा उपद्रव कमी झाला होता.
लोकसभा निवडणूकांच्या काळातही पोलिसांचा जागता पहारा असल्यामुळे हे प्रमाण घटले होते. मात्र, पंधरवडय़ापूर्वी एकाच दिवशी ठाणे शहरातून आठ महिलांचे दागिने खेचल्याच्या घटना घडल्या होत्या.
येत्या रविवारपासून ठाणे पोलीस यासंबंधीचे अभियान सुरू करणार असून त्यामध्ये पथनाटय़ आणि पत्रकाद्वारे जनजागृती करणार आहेत. यातील पत्रकामध्ये पोलिसांनी महिलांना ‘मोला’चे सल्ले दिले आहेत. लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमास जाताना शक्यतो खरे दागिने पर्स किंवा बॅगमधून घेऊन जा आणि समारंभाच्या ठिकाणी असलेल्या बंदीस्त खोलीत परिधान करा, असे पोलिसांचे म्हणणे आहे.