कोथींबीरीची एक लहानगी जुडी ६० रुपयांना. जेमतेम १०० ग्रॅम भरेल इतक्या आल्याची किंमत ३५ रुपये. तेवढय़ाच वजनाच्या हिरव्या मिरचीसाठी २५ ते ३० रुपये मोजण्याची तयारी ठेवा. जेवणात वाटण म्हणून वापरला जाणारा आणि एरवी पाच-दहा रुपयांमध्ये मुठभर मिळणारा हा ‘मसाला’ अव्वाच्या सव्वा दरांमुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणू लागला आहे. दादर, विर्लेपार्ले, ठाणे आणि वाशीतील किरकोळ बाजारातील आलं, कोथिंबीरीचे हे दर सर्वसामान्यांची कशी लुट सुरु आहे याचे द्योतक ठरतील. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या भाजीपाल्याच्या घाऊक बाजारात नाशीकची भलीमोठी कोिथबीरीची जुडी ८० ते १०० रुपयांना विकली जात आहे. असे असताना किरकोळ बाजारात मात्र तिचा दर २०० रुपयांपर्यत जाऊन भिडला आहे. विशेष म्हणजे, विलेपाल्र्याच्या किरकोळ बाजारात १०० गॅ्रम आल्यासाठी ३५ रुपयांची आकारणी सुरु असली तरी घाऊक बाजारात याच प्रतीच्या आल्याच्या किंमती बुधवारी ११ रुपयांपर्यंत खाली उतरल्या होत्या. कधी दुष्काळ तर कधी एलबीटीचे कारण सांगून सर्वसामान्यांची यथेच्छ लुट करणारे किरकोळ विक्रेते या महागाईसाठी आता मुसळधार पावसाचे कारण सांगू लागले आहेत.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या परिसराला पुणे तसेच नाशीक जिल्ह्यातून आयात होणाऱ्या भाजीपाल्याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वाशीतील घाऊक बाजारात आयात होणाऱ्या भाजीपाल्याचे प्रमाण घटल्यामुळे भाज्यांच्या घाऊक दरांमध्ये १० ते २० टक्के इतकी वाढ झाली आहे. यावर्षी कर्नाटक तसेच साताऱ्याहून येणारे आल्याचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे उत्तम प्रतीचे आलं किलोमागे १४० रुपयांनी विकले जात होते. नाशीक जिल्ह्यात कोथींबीरीचे पीक कमी असल्याने उत्तम प्रतीची मोठी जुडी १०० रुपयांनी विकली जात आहे. घाऊक बाजारात आलं, कोथींबीर काही प्रमाणात महागली असली तरी महागाईच्या या तव्यावर किरकोळ विक्रेत्यांनी पुन्हा एकदा आपली पोळी भाजून घेण्यास सुरुवात केली आहे.
आलं, कोथींबीरी, मिरच्यांच्या जोडीला चांगल्या प्रतीचा टॉमेटो- ७० रुपये, भेंडी-८० , गव्हार-६०, वांगी-६०, ढोबळी मिरची – ६० अशा प्रमुख भाज्याही किरकोळ बाजारात अव्वाच्या सव्वा दराने विकल्या जात आहेत. वाशीतील घाऊक बाजारात उत्तम प्रतीचा टॉमेटो किलोमागे २४ ते २८ रुपयांना विकला जात असताना किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपयांनी विक्री सुरु आहे. घाऊक बाजारात भेंडी ३० रुपयांना मिळत आहे, किरकोळ बाजारात हाच दर ७५ ते ८० रुपये असा आहे.  गेल्या आठवडय़ात महाग असलेल्या कोथींबीर तसेच आल्याचे दर उतरु लागले असून तुलनेने किरकोळ बाजारात मात्र चढे दर कायम आहेत, अशी माहिती एपीएमसीचे उपसचिव अविनाश पाटील यांनी लोकसत्ताला दिली.