हिरव्या मसाल्याचे दर भडकले

बाजारात भाज्या मिळेनाशा झाल्यात म्हणून शनिवार, रविवारी मांसाहाराचे बेत करीत असाल तर सावधान! चिकन, मटण, मासे यांच्या पाककृतीत आवश्यक घटक असलेला हिरवा मसालाही प्रचंड महाग झाला आहे. शेतकऱ्यांच्या संपामुळे निर्माण झालेल्या टंचाईमुळे गुरुवारी २० रुपये जुडी असलेली कोथिंबीर शुक्रवारी थेट २०० रुपये जुडी या दराने विकली जात होती. मिरची, पुदिना या हिरव्या मसाल्यातील घटकांच्या किमतीही प्रचंड वाढल्या आहेत.

शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी, दादरच्या क्रांतिसिंह नाना पाटील मंडईत भाज्यांच्या गाडय़ाच आल्या नाहीत. त्यामुळे गुरुवारी उरलेला मालच दिवसभर विकला जात होता. त्यातही कोथिंबीर, मिरच्या, पुदिना या हिरव्या मसाल्याचा मोठा तुटवडा दिसून आला. वाशी येथील घाऊक बाजारातच कोथिंबिरीची जुडी १०० रुपयांना विकली जात होती. त्यामुळे किरकोळ बाजारात कोथिंबिरीची जुडी दोनशे रुपये दरावर पोहोचली. पुदिन्याची जुडीही ७० रुपये दराने विकली जात होती. तरीही नाइलाजास्तव ग्राहक हिरवा मसाला खरेदी करीत होते. परंतु, दुपारनंतर कोथिंबिरीचा कालचा मालही संपला व अनेक ग्राहकांना रिकाम्या हातीच परतावे लागले.

कोथिंबीर, पुदिना, मिरची हा माल फार काळ टिकत नाही. मुळातच या भाज्या ट्रकमध्ये गच्च भरून येतात. त्यात उन्हाळा असल्यामुळे कोथिंबीर, पुदिना लवकर खराब होतात. याचा स्वयंपाकातील वापरही जास्त होत असल्यामुळे ग्राहक महाग असेल तरी या भाज्यांची खरेदी करतोच.

राजू यादव, भाजी विक्रेता, दादरची मंडई

kothimbir-chart