– संदीप आचार्य

म्हणायला विलगीकरण केलेला करोना वॉर्ड… करोनाचे रुग्ण व सामान्य रुग्ण एकाच ठिकाणी ठेवलेले. बेडवरील चादरीसुद्धा बेपत्ता. पाण्याच्या बाटल्या कुठेही पडलेल्या. काही रुग्णांच्या अंगावर कपडेच नाहीत तर काहींना आपले रिपोर्ट कधी मिळणार याचे उत्तरही कोणी देत नाही. गंभीर बाब म्हणजे करोना रुग्ण व सामान्य रुग्णांसाठी येथे एकच स्वच्छता गृह वापरले जाते. सकाळी दाखल झालेल्या मधुमेह असलेल्या करोना बाधित रुग्णाला सायंकाळपर्यंत पाणीही न मिळाल्याने रुग्ण परस्पर निघून जाऊन सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल होतो. हे भयावह चित्र आहे, कांदिवली पश्चिम येथील पालिकेच्या शताब्दी रुग्णालयातील…

येथील स्थानिक भाजप आमदार माजी राज्यमंत्री योगेश सागर यांच्या म्हणण्यानुसार शताब्दी रुग्णलयात करोना रुग्ण व सामान्य रुग्णांना कोणी वालीच नाही. “रुग्णालय प्रशासनाला फोन केला तर परिस्थिती उत्तम असल्याचे धादांत खोटे येथील डॉक्टर सांगतात. मी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना फोन केला तर त्यांनी नितीन करार यांना फोन करायला सांगितले. करीर यांना फोन केला तर त्यांनी महापालिकेत फोन करायचा ‘सल्ला’ दिला. पालिका अधिकाऱ्यांना कधी फोन लागतो तर कधी लागतच नाही. आयुक्त कधी फोन घेतात तर कधी घेत नाहीत. शताब्दी रुग्णालयात काल एका मधुमेह असलेल्या करोना रुग्णाला सकाळी दाखल केले. सायंकाळपर्यंत त्याला साधे पाणीही कोणी विचारले नाही. अखेर त्यांनी फॅमिली डॉक्टरला फोन केला तेव्हा त्यांनी सेव्हन हिल रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. रुग्णवाहिकेने या रुग्णांकडून कांदिवली ते अंधेरी येथे जाण्यासाठी १०,००० रुपये घेतले,” असे योगेश सागर यांनी सांगितले.

एका ज्येष्ठ महिलेची अशीच अवस्था… बघायलाच कोणी नाही. मला असे अनेक रुग्णांच्या नातेवाईकांचे फोन येत असतात. रुग्णालयात बेडवर चादर नाही, करोना रुग्ण व अन्य रुग्ण एकाच ठिकाणी असणे, अस्वच्छता, रुग्णांचे रिपोर्टही त्यांना अनेक दिवस कळवले जात नाहीत. एका लहान बाळाला व करोना रुग्ण एकाच ठिकाणी कसे ठेवले जातात असा अस्वस्थ करणारा सवालही त्यांनी केला. रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर सुशेगात आहेत. त्यांना फोन केला तर सर्व ठिक असल्याचे एकच उत्तर ते देतात. कदाचित ‘वरून’ त्यांना तसे आदेश असावेत….

“कांदिवली पूर्वेला असलेल्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात मरकजचे अनेक रुग्ण दाखल असल्याने डॉक्टर व परिचारिका पूर्ण तणावाखाली आहेत. येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना जेवण देण्याचे काम सामाजिक संस्था चालविणारे नयन शेठ करतात. रुग्णालयाच्या प्रशासनाने त्यांना जेवण देण्यास अचानक बंदी घातली व आमच्या जेवणाची व्यवस्था आम्हीच करू असे काल सांगितले. प्रत्यक्षात दुपारपर्यंत डॉक्टर व परिचारिकांना जेवणच दिले गेले नाही. येथील डॉक्टरांनी मला कळवल्यावर मी प्रशासनातील डॉक्टरांना फोन केला तेव्हा दोन वाजता जेवण पोहोचले खरे पण ते संपूर्णपणे आंबलेले असल्याने कोणी जेवू शकले नाही,” असे योगेश सागर म्हणाले. सामाजिक संस्था काम करायला तयार आहेत मात्र शताब्दी वा कामगार विमा रुग्णालय प्रशासन त्यांची मदत घेण्यास तयार नाही आणि स्वत: ही योग्य व्यवस्था करत नाही, असेही सागर यांनी सांगितले.

गंभीर बाब म्हणजे शताब्दी रुग्णालयाच्या स्वच्छतेची व्यवस्था एका सामाजिक संघटनेच्या माध्यमातून करण्याची तयारी आमदार सागर यांनी दाखवली. यासाठी कामगारांना हातमोजे, मास्कसह सर्व सामग्री देण्यात येईल असेही स्पष्ट केले तरीही शताब्दी रुग्णालयाच्या अधीक्षकांकडून कोणतेही सहकार्य स्वच्छतेसाठी केले जात नसल्याची खंत सागर यांनी व्यक्त केली.

शताब्दी रुग्णालयात करोना रुग्ण व सामान्य रुग्णांसाठी योग्य व्यवस्था तर नाहीच परंतु रुग्णांकडे पहाण्यासही कोणी दिसत नाही, असे खासदार गोपाळ शेट्टी यांनीही सांगितले. रुग्णालयातील भीषण वास्तव स्पष्टपणे दाखवणारा हा व्हिडिओच बोलका आहे. एका रुग्णाच्या नातेवाईकांनीच हा व्हिडिओ काढला असून हा स्फोटक व्हिडिओ पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना पाठवून रुग्णालयातील गंभीर परिस्थितीबाबत विचारणा केली असता त्यांनी याप्रकरणी उपायुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.

शताब्दी रुग्णालयातील परिस्थिती भयावह आहे. करोना रुग्णांबरोबरच सामान्य रुग्णांचे आरोग्य डावाला लागले असून परिस्थितीची सत्यता तपासण्याची हिम्मत पालिका आयुक्तांनी दाखवावी. मी स्वत: आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांना रुग्णालयात नेऊन वस्तुस्थिती दाखवायला तयार आहे. त्यांनी करोना सुट घालून पाहाणी करावी, असे आवाहनही आमदार योगेश सागर यांनी केले.