मुंबईमधील करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत मुंबई महापालिकेने महालक्ष्मी येथील रेसकोर्स, नेहरू विज्ञान केंद्र, माहीम निसर्गोद्यान, वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानामध्ये करोना काळजी केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी तब्बल २० हजार खाटांची व्यवस्था करण्यात येत असून करोनाची लक्षणे नसलेल्या, मात्र बाधा झालेल्यांची या केंद्रांमध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. करोनाची लक्षणे नसलेल्या, मात्र बाधा झालेल्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. दाटीवाटीच्या वस्तीतील आणि घरी विलगीकरणात राहण्याची सुविधा नसलेल्या अशा रुग्णांना करोना काळजी केंद्र-२ मध्ये ठेवण्यात येत आहे. पालिकेने काही ठिकाणी ‘करोना काळजी केंद्र-२’ उभारली असून अशा रुग्णांसाठी तेथे १४ हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

सातत्याने मुंबईतील रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे करोनाची लक्षणे नसलेल्या, मात्र बाधा झालेल्या रुग्णांसाठी आणखी खाटांची व्यवस्था करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी महालक्ष्मी येथील रेसकोर्स, नेहरू विज्ञान केंद्र, वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदान, माहीम निसर्गोद्यान, गोरेगावचे नेस्को मैदान येथे व्यवस्था करण्यात येत आहे. या ठिकाणी तब्बल २० हजार खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे लक्षणे नसलेल्या, मात्र बाधा झालेल्या तब्बल ३४ हजार रुग्णांची व्यवस्था करणे पालिकेला शक्य होणार आहे.

करोनाची तीव्र स्वरुपाची बाधा झालेल्या रुग्णांसाठी नायर, केईएम, सेव्हन हिल्स या रुग्णालयांमध्ये अतिरिक्त व्यवस्था करण्यात येत आहे. सध्या अशा रुग्णांसाठी तीन हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. आता आणखी १७५० खाटा उपलब्ध करण्यात येत असून अशा रुग्णांसाठीच्या खाटांची क्षमता ४,७५० इतकी होणार आहे.