गेल्या २४ तासांमध्ये राज्यात तब्बल २५ हजार ६८१ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक ३ हजार ६२ करोना बाधित हे मुंबईत सापडले आहेत. चिंतेची बाब म्हणजे आत्तापर्यंत मुंबईत एका दिवसात सापडलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. यासोबत आता मुंबईतल्या एकूण करोनाबाधितांचा आकडा ३ लाख ५५ हजार ८९७ इतका झाला आहे. यामध्ये २० हजार १४० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे शहराचा रिकव्हरी रेट ९१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. दुसरीकडे शहरात दिवसभरात १० रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा ११ हजार ५६५ इतका झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी करोनासंदर्भातल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

 

आज दिवसभरात मुंबईत १३३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ३ लाख २३ हजार २८१ इतका झाला आहे. शहरात आत्तापर्यंत ३६ लाख ६२ हजार ४७२ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर मुंबईचा रुग्ण दुप्पट होण्याचा दर १२४ दिवसांवर आला आहे.

Corona : राज्यात नव्या रुग्णांनी पुन्हा ओलांडला २५ हजारांचा टप्पा, ७० मृत्यूंची नोंद!

करोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली असून त्यानुसार सर्व थिएटर्स, नाट्यगृह आणि कार्यालयांमध्ये फक्त ५० टक्के कर्मचारी वर्गालाच परवानगी देण्यात आली आहे. आरोग्य आणि इतर जीवनावश्यक सेवा पुरवणाऱ्या कार्यालयांना यातून वगळण्यात आलं आहे.