साथ पसरण्याची भीती ; मुंबईत सर्वसामान्यांसाठी उपगरीय रेल्वे सेवेची प्रतीक्षा

करोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यामुळे राज्याच्या बहुतांश भागातील जनजीवन पूर्ववत होत असले तरी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील करोनाचा उद्रेक कायम आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे  ग्रामीण तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्य़ांतील करोनाची साथ वेळीच नियंत्रणात नाही तर ती शेजारील अन्य जिल्ह्य़ात पसरण्याचा धोका आहे.  त्यामुळे या जिल्ह्य़ातील निर्बंध अधिक कठोर करण्यासोबतच संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्याच्या सूचना मदत आणि पुनर्वसन विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

राज्यातील करोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सरकारने गेल्या दोन आठवडय़ापासून जिल्हयातील करोना बाधितांचे साप्ताहिक प्रमाण आणि प्राणवायूयुक्त खांटाची उपलब्धता या दोन निकषांच्या आधारे महापालिका आणि जिल्हा निहाय निर्बंध शिथिल करण्याचे धोरण अंमलात आणले आहे. त्यानुसार सोमवारपासून राज्यातील २० हून अधिक जिल्ह्य़ातील जनजीवन पूर्ववत झाले असून मुंबई, नाशिक सारख्या शहरातील  करोना आटोक्यात आला असला तरी के वळ खबरदारीचा उपाय म्हणून तेथील निर्बध अधिक प्रमाणात ठेवण्यात आले आहेत. राज्याच्या बहुतांश भागातील निर्बंध शिथिल झाल्याने प्रशासन आणि लोकांनी सुटके चा नि:श्वास सोडला असला तरी सहा जिल्ह्य़ांतील करोना बाधितांची संख्या गेल्या महिनाभरापासून वाढतीच आहे. सध्या करोना बाधितांचे सर्वाधिक प्रमाण कोल्हापूर जिल्ह्य़ात असून दररोज हजारपेक्षा अधिक रूग्णांची नोंद जिल्ह्य़ात होत आहे. अशीच परिस्थिती सातारा आणि पूणे ग्रामीण भागातील असून सांगली जिल्ह्य़ातील रूग्णही अजून कमी होताना दिसत नाहीत. कोल्हापूर जिल्हयालाच  लागून असलेल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्य़ातही दररोजचा बाधितांचा आकडा ८०० ते ९०० च्या दरम्यान असतो. रायगड जिल्ह्य़ातील करोनाची परिस्थितीही अजून चिंताजनकच आहे. हे सर्व जिल्हे एकमेकांना लागून असल्याने करोनाचा हा नवा हॉटस्पॉट तयार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या जिल्ह्यातील करोनाची साखळी वेळीच तुटली नाही तर ही साथ पुन्हा अन्य जिल्ह्य़ात पसरण्याचा धोका आहे. त्यामुळेच या सर्व जिल्ह्य़ांवर आता लक्ष्य के ंद्रीय करण्यात येत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

मुंबईत रेल्वे सेवा लगेचच परवानगी नाही

राज्यातील निर्बंध शिथिल करण्यास सुरूवात झाली आहे. मात्र करोनाचे नियम लोकांनी पाळले नाहीत, गर्दीवर नियंत्रण ठेवल नाही तर आणि करोना बाधितांचा आकडा वाढला तर निर्बंध पुन्हा लावले जातील असा इशारा मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला. करोना गेलेला नाही. त्यामुळे  लोकांनी जबादारीने वागायला हवे. आपला जिल्हा कुठल्या स्तरामध्ये ठेवायचा हे आता जनतेने ठरवायचे आहे असेही त्यांनी सांगितले. मुंबई सध्या स्तर तीनमध्ये ठेवण्यात आल्याने सध्या रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी खुली करता येणार नाही. मुंबई स्तर एकमध्ये आल्यावरच उपनगरीय रेल्वे सर्वसामान्यांसाठी खुली करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट के ले.   यातूनच मुंबईकरांना उपनगरीय रेल्वे सेवेतून लगेचच प्रवेश करण्यास परवावनगी मिळण्याची शक्यता कमीच आहे.