करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता मुंबईत लॉकडाउन करण्यात आले आहे. आता मुंबई-ठाण्याला भाजीपाल्याचा पुरवठा ज्या ठिकाणाहून होतो ते एपीएमसी मार्केट २५ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकर पिंगळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. परंतु या काळात भाजीपाल्याचा तुटवडा जाणवू नये यासाठी २४ तारखेला मार्केट सुरू राहणार आहे.

नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केटमध्ये रोज २००० गाड्यांमधून माल येतो. तसेच रोज सहा हजार लोकांची येथे वर्दळ असते. आता लॉकडाउनमुळे बहुतेक जण घरी आहेत. अनेक जण गावाला निघून गेले आहेत. लोकांची गर्दीच आता कमी झाली आहे. शिवाय शनिवारी एकूण मालापैकी २५० गाड्या माल वाया गेला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला मार्केट बंद ठेवावे लागत असल्याचेही संचालक शंकर पिंगळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

या काळात एपीएमसीमधील भाजीपाला, फले, कांदा-बटाटा मार्केट बंद राहणार आहे. त्यामुळे येत्या काळात सर्वसामान्यांना या सर्वांचीच चणचण भासण्याची शक्यता आहे.  याआधी एपीएमसी मार्केटने खबरदारी म्हणून काही उपायोजना करण्याचा निर्णय घेतला होता. एपीएमसी मार्केटमध्ये ग्राहकांनी गर्दी करु नये, यासाठी होलसेल व्यापाऱ्यांनी ग्राहकांना मार्केटमध्ये येण्याऐवजी फोनवरुन ऑर्डर देण्याचे आवाहन केले होते. रोग प्रतिबंधक उपायोजनांसाठी गुरुवार आणि रविवार असे दोन दिवस एपीएमसी बाजारपेठ बंद ठेऊन स्वच्छता करण्यात येणार होते. पण आता २५ ते ३१ मार्चपर्यंत पूर्ण एपीएमसी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.