मुंबई : मुंबईत करोना रुग्णसंख्येसह मृत्यूचे प्रमाणही कमी झाले असून शहरात गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत मृतांच्या संख्येत सुमारे २४ टक्कय़ांनी घट झाली आहे. शहरात प्रतिदिन रुग्णसंख्या ५०० पेक्षा कमी झाली तरी मृतांची संख्या मात्र दहापेक्षा अधिक होती. परंतु जुलैच्या शेवटच्या आठवडय़ापासून मृतांच्या संख्येतही घट होऊन प्रतिदिन मृत्यू होणाऱ्यांची संख्या १० पेक्षा कमी झाली आहे.

१८ ते २४ जुलै या आठवडय़ात २८२१ रुग्णांचे नव्याने निदान झाले असून ७६ मृत्यू झाले. याच्या आधीच्या म्हणजे ११ ते १७ जुलै या आठवडय़ाच्या तुलनेत रुग्णाची संख्या कमी झाली असली तरी मृतांची संख्या केवळ दोनने कमी झाली होती. २५ ते ३१ जुलै या काळात रुग्णसंख्याही कमी होऊन २३३७ पर्यंत कमी झाली आहे , तर मृतांची संख्या ५८ वर आली आहे. जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात रुग्णांच्या संख्येत सुमारे १७ टक्कय़ांनी आणि मृतांच्या संख्येत सुमारे २४ टक्कय़ांनी घट झाली आहे. ३ ऑगस्टला तर मुंबईत केवळ तीन मृत्यू नोंदले गेले. करोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये रुग्णालयात अनेक दिवस उपचार घेत असलेल्या, दीर्घकालीन आजार असलेल्या आणि ६० वर्षांवरील रुग्णांचे प्रमाण अधिक आहे.

कमी मृत्युदर टिकवून ठेवणे आव्हानात्मक

मृतांची संख्या नक्कीच कमी झाली असून हे आशादायक चित्र आहे. मुंबईत आता निर्बंध मोठय़ा प्रमाणात शिथिल केल्यानंतर आणि आगामी सण लक्षात घेता रुग्णसंख्या पुन्हा वाढेल. हे होणे साहजिकच आहे, परंतु त्या तुलनेत आता कमी झालेल्या मृतांची संख्या पुन्हा वाढणार नाही याची अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. कमी झालेला मृत्युदर टिकवून ठेवणे आव्हानात्मक आहे, असे मत मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले.

अतिदक्षता विभागाच्या खाटा ६४ टक्के रिक्त

मुंबईत सध्या ४६१६ रुग्ण उपचाराधीन आहेत. अतिदक्षता विभागाच्या २,२६६ खाटांपैकी १,४७१ म्हणजे सुमारे ६४ टक्के खाटा रिक्त आहेत. या विभागामध्ये ७९५ रुग्ण उपचार घेत आहेत.