संदीप आचार्य 
मुंबई महापालिकेतील जाहीर न केलेल्या ४५१ मृत्यू प्रकणाने प्रचंड खळबळ उडाल्यानंतर महापालिकेने युद्धपातळीवर पालिकेतील सर्व शिल्लक मृत्यूंचे विश्लेषण करण्याचे काम सोमवारी पूर्ण केले असून उद्यापर्यंत याचा अहवाल आरोग्य विभागाला सादर केला जाणार असल्याचे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पालिकेतील जवळपास ५६० शिल्लक मृत्यू प्रकरणांचे विश्लेषण करण्यात आले असून यापूर्वी जाहीर न केलेले ४५१ करोना मृत्यू व आताचे नवीन मृत्यू लक्षात घेता मुंबईतील करोना मृत्यूंमध्ये एकाचवेळी १००० मृत्यूंची भर पडण्याची शक्यता एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर व्यक्त केली. जर मुंबईतील मृत्यू एक हजाराने वाढले तर मृत्यूदरही सध्याच्या ३.७ टक्क्यांवरून वाढून ५ टक्क्यांपर्यंत जाईल अशी भीती आरोग्य विभागातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.

मुंबई महापालिकेने एप्रिल मधील जवळपास ४५१ करोना मृत्यू हे ‘करोना मृत्यू’ नसल्याची भूमिका घेतल्याने पालिका संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ८ जून रोजी महापालिकेने आरोग्य विभागाला पाठवलेल्या यादी व मेल मध्ये हे ४५१ मृत्यू करोनाचे असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर १२ जून रोजी पाठवलेल्या दुसऱ्या मेल मध्ये हे करोना मृत्यू म्हणून गृहित धरू नये अशी भूमिका पालिकेने घेतल्याचे आता स्पष्ट होत आहे. याबाबत पालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांकडे लोकसत्ताने विचारणा करूनही कोणतेही ठोस उत्तर मिळाले नाही. दरम्यान मुख्य सचिव अजोय मेहता यांनी या प्रकरणाची दखल घेत मुंबई महापालिकेतील एकूणच करोना मृत्यूंची माहिती दोन दिवसात जाहीर केली जाईल, असे स्पष्ट केले. तसेच यात कोणी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असेही सांगितले.

या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून पालिकेने शिल्लक असलेल्या मृत्यूंचे विश्लेषण करण्यासाठी पाठपुरावा सुरु केला. यासाठी ‘डेथ ऑडिट कमिटी’ पुढे सर्व कागदपत्रे येणे आवश्यक होते. काही मृत्यूप्रकरणांची कागदपत्रे अपलोड होण्यास वेळ लागत असल्याने पालिकेने शेवटी पेन ड्राईव्ह वर सर्व कागदपत्रे घेऊन सोमवारी सर्व शिल्लक मृत्यूंच्या विश्लेषणाचे काम पूर्ण केले गेले. यासाठी समितीत जवळपास वीस तज्ज्ञांनी काम केल्याचे समितीतील एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले. सुमारे ५६० हून अधिक शिल्लक प्रकरणांचे विश्लेषण करण्यात आले असून आज किंवा उद्यापर्यंत यातील किती रुग्णांचे करोनामुळे मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. मात्र पालिका सूत्रांच्या म्हणण्यानुसार आधीचे ४५१ व आताचे नवीन मृत्यू लक्षात घेता ही संख्या हजारच्या घरात जाऊ शकते. यात रोजच्या करोना मृत्यूंचाही समावेश असणार आहे.

मुंबईत आज करोनाचे एकूण ५९,२९३ रुग्ण असून मृत्यूची नोंद २२५० एवढी आहे. तर अॅक्टिव्ह रुग्ण २६९१० आहेत. राज्यात आजपर्यंत ४१२८ करोना रुग्णांचे मृत्यू झाले असून सरासरी मृत्यूदर आजच्या दिवशी ३.७० एवढा आहे. मात्र मुंबईतील वाढलेले हजार मृत्यू लक्षात घेतल्यास मृत्यूदर ५ टक्क्यापर्यंत जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. ठाण्यात ४८० मृत्यू नोंदवले असून अॅक्टिव्ह रुग्ण १०३६१ एवढे आहेत. पुण्यात आतापर्यंत ४९४ मृत्यू झाले तर सोलापूर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, अकोला तसेच पालघर व रायगड येथे मृत्यू वाढताना दिसतात. यातील काही ठिकाणी करोना मृत्यूंची संपूर्ण आकडेवारी जाहीर झाली नसावी असे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सांगितले. तसेच राज्यातील एकही करोना मृत्यू आम्ही लपवणार नाही, असेही मुख्य सचिव म्हणाले. राज्यातील सर्वच्या सर्व करोना मृत्यू जाहीर केले जातील,असेही त्यांनी सांगितले.