मुंबई, पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येकी एका नव्या रुग्णामुळे संख्या ४१ वर

मुंबई : जगभर थमान घालणाऱ्या करोना विषाणूने राज्यात मंगळवारी पहिला बळी घेतला. दुबईतून परतलेल्या ६४ वर्षीय रुग्णाचा मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली असतानाच मंगळवारी नवे दोन रुग्ण आढळल्याने राज्यात बाधितांची संख्या ४१ वर पोहोचली. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य व्यावसायिकांनी आपली दुकाने व आस्थापने बंद ठेवावीत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. पुण्यातील दुकानदार-व्यापाऱ्यांनी पुढाकार घेत दुकाने व हॉटेल्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर मुंबईसह राज्यातील अन्य ठिकाणीही हॉटेल व दुकाने बंद ठेवण्याबाबत संबंधितांनी पुढाकार घ्यावा. सिद्धिविनायक, महालक्ष्मी मंदिर आणि शिर्डीचे मंदिर यांच्या विश्वस्तांनी स्वत:हून मंदिर बंद ठेवण्याचा  निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर अन्य धर्मीयांनीही आपली धार्मिक स्थळे पुढील काही दिवस बंद ठेवून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारला सहकार्य करावे, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. आगामी पंधरा ते वीस दिवसांचा कालखंड अत्यंत महत्त्वाचा असून सरकारला जे जे शक्य आहे ते सर्व करण्यात येत आहे. मात्र, लोकांनी शिस्त पाळून योग्य सहकार्य केल्यास करोना नियंत्रणात आणणे शक्य होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, दुबई येथून आलेल्या ६४ वर्षीय रुग्णाचा मंगळवारी कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. राज्यातील करोनाचा पहिला बळी ठरलेले हे वृद्ध ५ मार्चला दुबईहून आले होते. त्यांना ७ मार्चला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर श्वसनासंबंधी उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना कस्तुरबामध्ये दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्यांनी औषधोपचाराला प्रतिसाद दिला. मात्र, मंगळवारी सकाळी ७ वाजता त्यांचा मृत्यू झाला.

राज्यात मंगळवारी करोनाबाधित दोन नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या ४१ झाली आहे. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड व मुंबईत मंगळवारी प्रत्येकी एक रुग्ण आढळला. मुंबईत सापडलेला रुग्ण हा ४९ वर्षांचा असून, तो ७ मार्चला अमेरिकेतून आला होता. त्याला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमेरिकेतून आलेला दुसरा रुग्ण हा २६ वर्षांचा असून, त्याला पिंपरी-चिंचवड येथील भोसरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राज्यात आजपर्यंत बाधित भागांतून ११६९ प्रवासी आले असून १८ जानेवारीपासून ताप, सर्दी व खोकला अशी लक्षणे आढळल्याने वेगवेगळ्या विलगीकरण कक्षांत ९०० लोकांना दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी ७७९ जणांना करोना नसल्याचे स्पष्ट झाले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही राज्यातील उद्योगपतींची बैठक घेऊन त्यांच्या उद्योगातील कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास सांगण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक उद्योजकांनी आपल्या आस्थापनांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

वृत्तवाहिन्यांमुळे सुट्टीबाबत गोंधळ

शासकीय कार्यालयांना आठवडाभर सुट्टी देण्यात आल्याचे वृत्त मंगळवारी काही वाहिन्यांनी प्रसारित केले होते. मात्र, शासकीय कार्यालयांना सुट्टी न देता पन्नास टक्के कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने कार्यालये चालवता येतील का, याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मात्र, तोपर्यंत सुट्टीबाबत गोंधळ निर्माण झाला होता.

उपनगरी रेल्वे सेवा तूर्त सुरूच

उपनगरी रेल्वेसह बस सेवा बंद करण्याचा निर्णय तूर्त तरी घेण्यात आलेला नाही. मात्र, लोकांनी स्वयंशिस्त पाळली नाही आणि गर्दी ओसरली नाही तर नाइलाजाने उपनगरी रेल्वे सेवा आणि बस सेवा बंद करण्याचा कठोर निर्णय सरकारला घ्यावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

३९ मेल-एक्स्प्रेस रद्द

करोनाच्या पार्श्वभूमीवरखबरदारीचे उपाय म्हणून मध्य रेल्वेने २९ आणि पश्चिम रेल्वेने १० अशा एकूण ३९ मेल-एक्स्प्रेस १८ मार्च ते २ एप्रिलदरम्यान न चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मध्य रेल्वेवरील मुंबई-पुणेदरम्यानच्या डेक्कन, प्रगती एक्स्प्रेस, मुंबई ते नागपूरदरम्यानची नंदीग्राम एक्स्प्रेस यासह पश्चिम रेल्वेवरील दुरान्तो व हमसफर गाडय़ांचा समावेश आहे.

इराणमधील २५० भारतीयांना लागण?

इराणमध्ये २५० हून अधिक भारतीय नागरिकांना करोनाची लागण झाल्याचे वृत्त मंगळवारी सर्वत्र पसरले होते. मात्र, याबाबत निश्चित माहिती देऊ शकत नाही, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

देशातील रुग्णसंख्या १३७

देशातील करोनाबाधितांची संख्या १३७ वर पोहोचली आहे. त्यातील परदेशी नागरिकांची संख्या २४ आहे. राज्यातील पहिल्या बळीमुळे देशातील करोनाबळींची संख्या तीन झाली. सोमवारी रात्रीपासून देशात करोनाचे २३ नवे रुग्ण आढळले आहेत. जगभरात आतापर्यंत करोनाने ७१०० बळी घेतले आहेत.

एसटीच्या २० हजार फे ऱ्या रद्द : करोनाच्या धास्तीने प्रवाशांनी एसटीचा प्रवासही नाकारला आहे. ११ मार्च ते १६ मार्चपर्यंत एकूण २० हजार ९५७ बस फे ऱ्या रद्द करण्याची वेळ एसटी महामंडळावर आली. त्यामुळे महामंडळाला ३ कोटी १७ लाख ६६ हजार रुपये महसूल कमी मिळाला. मुंबई विभागातील मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग मिळून ७ हजार १७९ फेऱ्या रद्द करण्यात आल्या.