शैलजा तिवले

एकीकडे लशीची सुरक्षितता, परिणामकता याबाबतची साशंकता आणि गरज यामुळे आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी कमी येण्याची शंका व्यक्त केली जात आहे तर दुसरीकडे करोनाची पुनर्लागण झालेल्या २ टक्के  आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी सौम्य लक्षणे असलेल्यांना दुसऱ्यांदा तीव्र लक्षणे आढळल्याचे संशोधन अभ्यासातून निदर्शनास आले आहे. तेव्हा करोनाची पुन्हा लागण होण्याचा सर्वाधिक धोका असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रतिबंधात्मक लस घेणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. हा संशोधनात्मक अभ्यास ‘जर्नल ऑफ द असोसिएशन ऑफ द इंडिया’ या नियतकालिकात नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

मुंबईतील पहिले करोना रुग्णालय असलेल्या नायरमध्ये एप्रिल ते ऑक्टोबर या काळात ४९१ आरोग्य कमर्चाऱ्यांना करोनाची लागण झाली. यातील नऊ जण करोनातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर साधारण ४३ ते ७८ दिवसांनी पुन्हा लक्षणे दिसून आल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. यात पाच पुरुष आणि चार महिला असून २५ ते ५० वयोगटातील होते. आठजणांच्या ‘आरटीपीसीआर’ चाचणीत करोना असल्याचे स्पष्ट झाले, तर एका रुग्णाचे निदान सिटी स्कॅनमध्ये केले गेले.

ज्या पाच रुग्णांना पहिल्यांदा करोनाची लागण झाली तेव्हा सौम्य लक्षणे होती. दोन ते सहा दिवसांत बरे झाले होते. त्या रुग्णांना दुसऱ्या वेळेस मात्र तीव्र लक्षणे आढळली. तसेच एकाहून अनेक लक्षणे होती. यातील एका रुग्णाला श्वसनाचा तीव्र आजार झाल्याचेही आढळले. या रुग्णांना दुसऱ्यांदा बरे होण्यास पाच ते १८ दिवसांचा कालावधी लागला. या उलट ज्या चार जणांना पहिल्या वेळी कोणतीही लक्षणे नव्हती. त्यांना दुसऱ्या वेळी मात्र सौम्य लक्षणे आढळली. पहिल्या वेळी लक्षणे सौम्य असलेल्यांमध्ये रोगप्रतिकारशक्ती आवश्यक प्रमाणात निर्माण होऊ शकली नसल्याने दुसऱ्या वेळेसच्या संसर्गाला ते प्रतिकार करू शकले नाहीत, असे निरीक्षण या अभ्यासात मांडले आहे.

एकाच रुग्णालयात दुसऱ्यांदा करोनाची लागण झालेले रुग्ण सध्याच्या अभ्यासांमध्ये नायरमध्येच अधिक आढळले आहेत. एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण नगण्य आहे. मात्र तरीही सामान्य नागरिकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनीही बाधा झाल्यानंतर करोना प्रतिबंधात्मक काळजी घेणे गरजेचे आहे. गाफील राहून चालणार नाही, असे या अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. नीरज महाजन यांनी व्यक्त केले.

लसीच्या प्रभावाबद्दल साशंकता

एकीकडे पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण येत्या आठवडय़ात सुरू होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे लशीची सुरक्षितता, परिणामकता याबाबतची साशंकता आणि समाजमाध्यमांवरील संदेश यामुळे वैद्यकीय वतुर्ळातही लस न घेणारा एक वर्ग तयार होत असून यामुळे नोंदणी केलेल्यांपैकी काही आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी येणार नाहीत अशी शंका पालिके च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

बाधितांनीही लस घ्यावी

देशभरात १५ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. बाधित झालेल्यांमध्ये नैसर्गिकरीत्या तयार झालेली रोगप्रतिकारशक्ती अधिक काळ सुरक्षितता देत नाही. तेव्हा बाधित झालेल्यांनी लस घेणे आवश्यक असल्याचे मत करोना लसीकरण कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी मांडले.

सर्वानी लस घेणे गरजेचे

आरोग्य कमर्चाऱ्यांना संसर्गाचा अधिकांश धोका आहे. त्यात पुनर्लागण होण्याची शक्यता आणि नवा संकरित विषाणू यामुळे सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेणे आवश्यक आहे, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी स्पष्ट केले.