एसटीच्या ताफ्यात येणाऱ्या   वीजेवरील १५० ‘शिवाई‘ वातानुकूलित बसगाडय़ांना करोनाचा फटका बसला आहे. महाराष्ट्रातच ५० बसच्या बांधणीसाठी चीनहून येणारा बसचा सांगाडा आणि प्रत्यक्षात बांधणी होऊनच चीनमधून  दाखल होणाऱ्या ऊर्वरित बस गाडय़ांना एसटीच्या ताफ्यात येण्यास विलंब होणार असल्याची माहीती, एसटीतील सूत्रांनी दिली.

चीनमधील परिस्थीती आणि सध्या भारतात सुरू असलेले लॉकडाऊन, त्यामुळे कारखान्यातील कामकाजावर झालेला परिणाम, एसटीला होत असलेला तोटा इत्यादी प्रश्न निर्माण झाले असून त्यामुळे शिवाई बसगाडय़ांवरही त्याचा परिणाम झाल्याचे सांगितले.

पर्यावरणस्न्ोही आणि इंधनावरील खर्च आटोक्यात आणण्यासाठी एसटी महामंडळाने विजेवर धावणाऱ्या वातानुकूलित बस आणण्याचा निर्णय घेतला होता. या सेवेचे उद्घाटन सप्टेंबर २०१९ मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानुसार भाडेतत्वावरील १५० बससाठी निविदा प्रक्रिया राबवून दोन कंपन्यांना याचे काम देण्यात आले. यातील एका

कंपनीकडून ५० बसगाडय़ांसाठीची बांधणी महाराष्ट्रातच करताना त्यासाठी लागणारा सांगाडा चीनमधून,  तर दुसऱ्या कंपनीकडून बसची बांधणी न करता प्रत्यक्षात १०० बस चीनमधूनच घेण्यात येणार आहेत.

पहिल्या कंपनीला ५० पैकी १५ बससाठी लागणारा सांगाडा चीनहून आधीच मिळाला आहे. मात्र ऊर्वरित ३५ बससाठीचा सांगाडा आलेला नाही. ऑगस्ट २०२० पर्यंत या कंपनीकडून १५ बस एसटीत दाखल केल्या जाणार होत्या. अशापद्धतीने टप्प्याटप्यात ५० बस डिसेंबपर्यंत दाखल करण्याचे उद्दिष्ट होते. परंतु या बस दाखल करण्याचा त्याचा कालावधी आणखी तीन महिन्यांनी वाढला आहे.  याचबरोबर दुसऱ्या कंपनीसोबत अद्याप करार झालेला नाही. तो लवकरच होणार आहे.

या कंपनीकडून बसची बांधणी न करता त्या चीनमधूनच विकत घेण्यात येणार होते. मात्र करोनामुळे चीन व भारतातील परिस्थिती पाहता कंपनीने मुदतवाढ मागितली आहे. तसे पत्रच महामंडळाला दिले आहे. सूत्रांनी सांगितले की, यामुळे प्रवाशांच्या सेवेत येण्यासाठीही विजेवरील बसला विलंबच होईल. त्यातच करोनामुळे एसटी महामंडळालाही मोठा आर्थिक फटका बसत आहे. मार्च महिन्यातच एसटी फेऱ्या रद्द होणे आणि त्यानंतर सुरु झालेली टाळेबंदी यामुळे होणारी आर्थिक हानी पुढील दोन ते तीन महिने भरुन न निघणारी आहे. दररोजचे उत्पन्न बुडतानाच त्याशिवायही एप्रिल ते जून हा गर्दीचा हंगामात मिळणारे अधिकचे उत्पन्नही बुडाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन, इंधनाचा खर्च, भाडेतत्वावरील बसगाडय़ांचे पैसे देणे आधी प्रश्न एसटी महामंडळासमोर उभे ठाकले आहेत.