करोनाचा फटका एसटीच्या सेवेत रुजू होणाऱ्या सुमारे ३ हजार चालक कम वाहकांनाही बसला आहे. करोनाकाळात पूर्णपणे प्रशिक्षण बंद करण्यात आले. यामध्ये २१३ महिलांचाही समावेश आहे.

मार्च महिन्यापासून टाळेबंदी लागली आणि एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली. याशिवाय एसटीचे विविध कामकाजही बंद झाले. यात राज्यात एसटीच्या भरती प्रक्रि येवरही परिणाम झाला. एसटी महामंडळाने नवीन चालक कम वाहकांची भरती प्रक्रि या सुरू केली आहे. परंतु मार्च महिन्यापासून टाळेबंदी सुरू झाली आणि करोनाकाळात एसटी महामंडळाने प्रशिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला.  सध्या टाळेबंदीच असल्याने प्रशिक्षण पूर्णपणे बंदच आहे. एसटीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांच्या प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षांचा आहे. यातील पाच महिने वाया गेले पुढील आदेश येईपर्यंत प्रशिक्षण बंद ठेवले आहे.

२१ आदिवासी महिला डिसेंबर २०२० पर्यंत, तर त्यानंतर त्वरित उर्वरित महिलाही एसटीच्या सेवेत रुजू होणार होत्या, परंतु त्यांना एप्रिलनंतरचाच मुहूर्त मिळणार आहे.

करोनामुळे चालक कम वाहकांचे प्रशिक्षण थांबविले आहे. यामध्ये साधारण तीन हजार जण आहेत. प्रशिक्षण थांबविल्याने ते सेवेत काहीसे उशिरा येतील.

– शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ