संदीप आचार्य, लोकसत्ता

आगामी काळात महाराष्ट्रातील करोना रुग्ण व मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार असून शहरांमधील रुग्णालयांची क्षमता आता संपल्यात जमा आहे. अशावेळी केंद्राने सर्वशक्तीनिशी महाराष्ट्राला लस पुरवठा करणे, २५ वयावरील सर्वांना लस देण्यास परवानगी देण्याबरोबरच सर्व वैद्यकीय मदत उपलब्ध करून द्यायला हवी. पण त्याऐवजी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण हे आंतरराष्ट्रीय निकषांच्या गप्पा मारत केंद्र सरकाराला चुकीचे सल्ले देत असल्याचा घणाघाती आरोप राज्याचे माजी आरोग्य महासंचालक व राज्याचे करोनाविषयक मुख्य सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी केला आहे. देशातील एकूण करोना रुग्णांच्या तुलनेत महाराष्ट्रातील करोना रुग्ण व मृत्यूचा विचार करून मोठ्या प्रमाणात लसी तसेच आरोग्य सामुग्री पाठवणे गरजेचे आहे. मात्र, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण हे आंतरराष्ट्रीय निकष व नियम काय आहेत ते सांगत बसले आहेत. मुळात किती वयापर्यंत लस द्यायची याचे कोणतेही आंतरराष्ट्रीय निकष व नियम ठरलेले नाहीत. असे नियम असल्यास राजेश भूषण यांनी ते दाखवून द्यावेत, असं आव्हानच डॉ. सुभाष साळुंखे यांनी दिलं आहे.

“राजेश भूषण कोणते निकष सांगत आहेत?”

केंद्रीय आरोग्य सचिवांकडून केंद्राला चुकीचे सल्ले दिले जात असून त्याचा फटका महाराष्ट्राला बसत आहे. २५ वर्षावरील सर्वांना लस व पुरेशी लस केंद्राने उपलब्ध करून दिली नाही तर उद्या राज्यात करोना रुग्णांच्या होणाऱ्या मृत्यूची जबाबदारी केंद्रातील मंडळी घेणार आहेत का? असा सवाल करून डॉ. साळुंखे म्हणाले आज अमेरिका, इंग्लंड, इस्रायल आदी देशांनी लस देण्याचे वय १२ व १८ वर्षे केले असताना राजेश भूषण हे कोणत्या आंतरराष्ट्रीय निकषांच्या गप्पा मारत आहेत? प्रत्येक देश आपल्याकडील परिस्थितीचा विचार करून निर्णय घेत आहे. महाराष्ट्रातील करोनाची भीषण परिस्थिती लक्षात घेता किमान २५ वयापुढील सर्वांना लस मिळाली पाहिजे, असं साळुंखे म्हणाले.

आगामी दोन दिवसात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. यापूर्वीही केंद्रीय आरोग्य पथक अनेकदा महाराष्ट्रात येऊन गेले. आता नव्याने येऊन हे पथक काय दिवे लावणार? असा संतप्त सवाल डॉ. सुभाष साळुंखे यांनी केला आहे. हे केंद्रीय पथक जे मार्गदर्शन करेल त्याच्यापेक्षा कितीतरी चांगले उपाय आरोग्य विभागातील आमचे डॉक्टर सांगू शकतात. गेले वर्षभर दिवसरात्र आरोग्य विभागाचे जिल्ह्यातील डॉक्टर केवळ करोनाचेच रुग्ण नव्हे तर एकूणच आरोग्यसेवा सांभाळत आहेत, असं ते म्हणाले.

“सर्व ऑक्सिजन खाटा सरकारने ताब्यात घ्याव्यात”

राज्यात करोनाचे रुग्ण व मृत्यू वेगाने वाढतील असे सांगाताना आज आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण असला तरी आरोग्य यंत्रणा व प्रशासन हतबल झालेले नाही. राज्य करोना कृती दलाचा तांत्रिक सल्ला सातत्याने उपलब्ध आहे. त्यांनी रुग्णोपचारासाठी ज्या उपाययोजना सुचविल्या आहेत त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यास बरेच मृत्यू रोखता येतील. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी शहरातील रुग्णालयांमधील खाटा आता जवळपास शिल्लक नाहीत. आगामी काळात परिस्थिती कठीण बनणार असल्याने सर्व खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन खाटा सरकारने ताब्यात घेणे गरजेचे आहे, असं देखील डॉ. साळुंखे यांनी नमूद केलं.

मृत्यू वाढण्यातील एक प्रमुख कारण म्हणजे रुग्ण उशीरा उपचारासाठी रुग्णालयात येतो हे आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात गेल्या काही दिवसांत १२ रुग्ण हे रुग्णालयाच्या वाटेवर असताना किंवा दाखल होता होता मरण पावले आहेत. याशिवाय अनेक खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात तसेच व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना त्यांच्याकडील पैसे संपले असे दिसताच रुग्णालयांकडून शासकीय रुग्णालयात हलवले जाते. अशा रुग्णांना अन्यत्र रुग्णवाहिकेतून हलवताना योग्य काळजी न घेतल्यानेही मृत्यू होत आहेत. याचा विचार करून रुग्ण वेळेत रुग्णालयात दाखल होईल तसेच पैसे संपले म्हणून खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभाग व व्हेंटिलेटरवरील रुग्णाला अन्यत्र हलवले जाणार नाही याची काटेकोर दक्षता घेणे गरजेचे आहे. आजच्या भीषण परिस्थितीत खासगी रुग्णालयांनीही केवळ पैशाचे न पाहाता सामाजिक जबाबदारी उचललीच पाहिजे, असे डॉ. साळुंखे म्हणाले. यापुढे परस्पर असे रुग्ण अन्यत्र हलवायचे झाल्यास संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची परवानगी अनिवार्य करा, असेही ते म्हणाले.

“मुंबई पॅटर्न संपूर्ण राज्यात राबवा”

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी रुग्णालयात खाटा उपलब्ध करून देण्याबाबत जी नियमावली तयार केली आहे ती संपूर्ण राज्यात लागू केल्यास रुग्णांना वेळेत खाटा व उपचार मिळतील. मुंबईत खासगी रुग्णालयातील खाटांचे वितरण हे पालिकेच्या माध्यमातून केले जाते. परस्पर कोणालाही कोठेही दाखल होता येत नाही, परिणामी मोठ्या संख्येने रुग्णांना कमीत कमी वेळात रुग्णालयात दाखल होणे शक्य झाले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी सर्व राज्यांसाठी समान धोरण व आंतरराष्ट्रीय निकषांच्या बाता मारत आहेत ही दुर्दैवी गोष्ट आहे. जिथे आग लागेल तिथे तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या जाणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील करोना परिस्थिती देशातील अन्य कोणत्याही राज्यापेक्षा भयकारी आहे. रोज ५० हजाराहून जास्त रुग्ण सापडत आहेत. मुंबईसारख्या शहरात १० हजार रुग्ण रोज आढळतात. अशी परिस्थिती देशात कुठे नाही. अशावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्राला मदतीसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच राज्यातील मंत्र्यांनी एकजुटीने केंद्राकडे महाराष्ट्राला लस तसेच अन्य मदत मिळावी यासाठी पाठपुरावा केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.