आगाऊ आरक्षण रद्द करण्याचा सपाटा; ९० टक्के खोल्या रिकाम्या असल्याचा दावा

मुंबई : करोना संसर्गाने खाद्यपदार्थ, मद्य विकणाऱ्या हॉटेलांपेक्षा निवारा उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. परदेशी पर्यटकांपाठोपाठ देशातील पर्यटकांनीही आरक्षण रद्द करण्याचा सपाटा सुरू केल्याने शहरातील सर्वच निवासी हॉटेल ओस पडल्याचे चित्र आहे.  तारांकित हॉटेलमालकांनाही त्याचा फटका जाणवतो आहे.

करोना संसर्गामुळे पर्यटन किंवा व्यावसायिक उद्देशाने भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांचे प्रमाण पूर्णपणे आटले. त्यासोबत सुटीच्या ऐन हंगामात करोनाच्या भीतीमुळे भारतीय नागरिकांनीही देशांतर्गत पर्यटनाचा बेत रद्द केला आहे. त्याचा थेट फटका निवाऱ्याची व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल क्षेत्राला बसल्याची माहिती हॉटेल रेस्टॉरन्ट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष गुरुबक्षीससिंग कोहली यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. शहरातील सर्व निवारा हॉटेलमधील आरक्षण ९० टक्क्यांनी घटल्याचा दावा कोहली यांनी केला. देशीविदेशी पर्यटकांसह व्यवसायाच्या निमित्ताने कंपन्यांनी केलेले आरक्षण रद्द होण्याचा सपाटा सुरू आहे. परिणामी सुमारे ९० टक्के खोल्या ओस पडून आहेत. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, दीव-दमण संघटनेशी संलग्न असलेल्या हॉटेल व्यवस्थापनांना आरक्षण रद्द करताना कोणतेही रद्दशुल्क आकारू नये (कॅन्सलेशन चार्ज) असे आवाहन संघटनेने केले आहे.

या परिस्थितीला व्यक्ती, शासन जबाबदार नाही. हा अपघात आहे. त्यामुळे ही साथ रोखण्याची जबाबदारी सरकार किंवा शासनासोबत प्रत्येकाची आहे. ही जाण ठेवत सर्व सदस्यांना ‘आधी समाज, नंतर व्यवसाय’ ही संघटनेची भूमिका कळविण्यात आल्याचेही कोहली यांनी सांगितले.

हॉटेल व्यावसायिकांना धास्ती

खाद्यपदार्थ, मद्य उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल, बार व्यवसायात ६० टक्के कपात झाल्याचा दावा आहार संघटनेने केला आहे. करोनाच्या भीतीने हॉटेल, बारमध्ये येणारी गर्दी मोठय़ा प्रमाणात आटली. त्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला. नागरिक घरातून बाहेरच पडले नाहीत तर हॉटेलांचा व्यवसाय कसा होणार, कामगारांना पगार कसे मिळणार, हे प्रश्न आहेतच; पण त्यासोबत एप्रिलपूर्वी हॉटेल चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या परवान्यांचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. त्याचे शुल्क आठ लाखांवर आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायाच्या दृष्टीने परिस्थिती बिकट असल्याचे ‘आहार’चे माजी अध्यक्ष आदर्श शेट्टी यांनी सांगितले.

मद्यविक्रेतेही चिंताग्रस्त

नागपूरसह राज्याच्या काही शहरांमध्ये वाइन शॉप म्हणजे मद्यविक्री दुकान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील वाईन शॉप चालकांचे धाबे दणाणले आहेत. बार ओस पडू लागल्याने वाईन शॉपचा व्यवसाय वधारला, ही अफवा असल्याचे वाइन शॉप चालकांच्या संघटनेकडून सांगण्यात आले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यास आम्ही तो पाळू. करोनाची साथ आटोक्यात आणण्यासोबत हॉटेल व्यवसायावर अवलंबून असलेल्या लाखो कर्मचारी आणि ग्राहकांच्या दृष्टीनेही विचार होणे अपेक्षित आहे.

– शिवानंद शेट्टी, अध्यक्ष, आहार