जसलोक रुग्णालयातील १२ परिचारिकांना करोनाची लागण झाली आहे. मात्र जसलोक रुग्णालय बंद के ले नसले तरी रुग्णालयातील बाह्य़रुग्ण विभाग बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाबाधित रुग्णानंतर येथील परिचारिकांनाही करोनाची लागण झाल्याने ३० मार्चपासून रुग्णालयाचा बाह्य़रुग्ण विभाग बंद आहे.

करोनाबाधित रुग्णांपैकी बहुतेकांना सुरुवातीला कोणतीही लक्षणे नसल्याने, रुग्णांकडून माहिती लपविल्याने उपचार करणाऱ्या डॉक्टरांपासून रुग्णालयातील अनेक कर्मचारी या रुग्णांच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळे आरोग्य सेवेचे कर्मचाऱ्यांमध्ये करोनाची बाधा मोठय़ा प्रमाणात होत आहे.

जसलोक रुग्णालयात मूत्राशयाचा आजार असलेल्या रुग्णाला करोनाची बाधा झाल्याचे लक्षात आल्यानंतर रुग्णालयाने ३० मार्चलाच बाह्य़रुग्ण विभाग बंद केला होता. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १०० कर्मचाऱ्यांच्या चाचण्या त्या आठवडय़ात केल्या होत्या. त्यातील एका परिचारिकेला करोनाची बाधा झाल्याचे ३१ मार्चला समजले. शनिवारी रुग्णालयातील अजून ११ परिचारिकांनाही करोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. १२ परिचारिकांना रुग्णालयातच उपचार सुरू आहेत.

रुग्णालय बंद केल्याची अफवा

रुग्णालयातील एक हजार कर्मचाऱ्यांच्या चाचण्या केल्या असून त्या नकारात्मक आलेल्या आहेत. त्यामुळे रुग्णालयाचे केवळ बाह्य़रुग्ण विभाग ३० मार्चपासून बंद केला आहे. संपूर्ण रुग्णालय सोमवारपासून बंद झाल्याच्या अफवा आहेत. करोनाबाधित आणि आपत्कालीन विभागातील सर्व सेवा सुरू असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.