मुंबईत दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दक्षिण मुंबईतील एका केंद्रावर या विद्यार्थ्यांने परीक्षा दिली होती. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेले शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा शोध आरोग्य विभाग घेत असल्याचे समजते.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने शाळा, महाविद्यालये बंद केली. मात्र, दहावीची परीक्षा सुरूच ठेवण्यात आली होती. पालक, शिक्षकांच्या मागणीनंतर दहावीची एका विषयाची परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली. मात्र, दक्षिण मुंबईतील एका परीक्षा केंद्रावर दहावीची परीक्षा दिलेल्या एका विद्यार्थ्यांला करोनाची लागण झाली आहे. त्याच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

परीक्षेदरम्यान हा विद्यार्थी जवळपास ३५ ते ४० विद्यार्थ्यांच्या संपर्कात आल्याची शक्यता आहे. या विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचा शोध आरोग्य विभाग घेत आहे. या केंद्रात ३५३ विद्यार्थी परीक्षा देत होते. एक वर्गात २५ ते ३० विद्यार्थी अशी आसन व्यवस्था होती. विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण विभागाकडून आरोग्य विभागाला देण्यात आली आहे.