संदीप आचार्य

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये विविध आजारांवरील उपचार तसेच शस्त्रक्रियांसाठी दाखल झालेल्या रुग्णांपैकी काही रुग्णांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. परळच्या केईएम रुग्णालयात वेगवेगळ्या वॉर्डात १६ जणांना करोनाची लागण झाली तर शीव रुग्णालयात सात रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अन्य रुग्णोपचार व शस्त्रक्रिया नियंत्रित करणे व आवश्यक खबरदारी घेण्यात येत असल्याचे ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

करोना रुग्णांची संख्या कमी होताच मधल्या काळात अन्य आजारांवरील उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली. हे रुग्ण व त्यांच्याबरोबर येणाऱ्या नातेवाईकांमुळे उपचारासाठी दाखल झालेल्या काही रुग्णांना करोना झाल्याचे दिसून आले आहे. रुग्णांबरोबर येणाऱ्या नातेवाईकांवर नियंत्रण ठेवणे एका मर्यादेपलीकडे शक्य नाही. परिणामी शीव रुग्णालयातील सुमारे सात रुग्णांना करोनाची बाधा झाली असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली. त्यामुळे अत्यावश्यक शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णाला नाकारणे शक्य नाही, तथापि पूर्वनियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलता येतील का, याचा आढावा आम्ही घेत असल्याचे डॉ. जोशी म्हणाले.

महापालिकेच्या केईएम रुग्णालयात अन्य आजारांवरील उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांपैकी १६ जणांना करोना झाल्याचे आढळले आहे, असे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले. येथील वॉर्ड क्रमांक पाचमध्ये चार करोना रुग्ण, सहामध्ये दोन, महिलांच्या वॉर्ड ३३ मध्ये दोन महिलांना करोनाची लागण झाली आहे.