पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मुंबईतील ५६ कर्मचाऱ्यांना करोना विषाणूची लागण झाली आहे. यात रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी (आरपीएफ), लोको पायलटसह निवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

आतापर्यंत लागण झालेल्या ५६ कर्मचाऱ्यांमध्ये मध्य रेल्वेवरील ३६ आणि पश्चिम रेल्वेवरील २० कर्मचारी असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. त्यांच्यावर पश्चिम रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २८ रेल्वे कर्मचाऱ्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. या शिवाय आणखी २४ संशयित रुग्णही सापडले आहेत. यात मध्य रेल्वेच्या १९ आणि पश्चिम रेल्वेचे सहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

बाधितांमध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी अधिक आहेत. त्यापाठोपाठ तांत्रिक विभागातील कर्मचारी, एक्स्प्रेस गाडय़ांवरील लोको पायलट, रुग्णालयातील डॉक्टर, निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करून घरातच अलग राहण्याच्याही सूचना दिल्या आहेत. कार्यरत रेल्वे कर्मचारी, सुरक्षा दलाचे जवान, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मुखपट्टय़ा, जंतुनाशके, पीपीई किट्स अशी साधने तातडीने उपलब्ध करण्याच्या सूचना प्रशासनाने के ल्या आहेत.

‘जगजीवनराम’मध्ये ९१ रुग्ण

जगजीवनराम रुग्णालयात एकू ण ९१ करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात ११ इतरही नागरिक आहेत. उपचार सुरू असताना दोन जणांचा मृत्यू झाल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.