राज्यातील करोनाचा संसर्ग आता पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. करोनाच्या विळख्यात सर्वसामान्यांसह व्हीव्हीआयपी व्यक्ती देखील अडकत आहेत. आतापर्यंत राज्यातील अनेक मंत्र्यांना करोनाचा संसर्ग झालेला आहे. एवढच नाही तर राज्याचे आरोग्यमंत्री, गृहमंत्री देखील करोनाच्या विळख्यात सापडलेले आहेत. दरम्यान आता मंत्रालयात देखील करोनाने पुन्हा एकदा प्रवेश केला असुन, महसुल विभागाच्या आठ कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

एकाच विभागात एवढ्या संख्येने कर्मचारी करोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. आज महसुल विभागात २२ जण गैरहजर होते, त्यातील आठ जण करोनाबाधित आढळले आहेत. तर उर्वरीत जण अन्य आजाराने त्रस्त असल्याने ते गैरहजर असल्याचं समोर येत आहे. एबीपी माझाने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

मुंबई, पुण्यानंतर आता नागपुरातही निर्बंध लागू; शाळा, लग्नाचे हॉल बंद राहणार

दरम्यान, करोनाच्या वाढत्या रुग्णांमुंळे मुंबई, पुणे, अकोला, यवतमाळ, अमरावतीमध्ये पुन्हा एकदा निर्बंध लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील रविवारी जनतेशी संवाद साधताना परिस्थिती पाहून पुढील आठ दिवसांत लॉकडाउनसंबंधी निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यातच आता करोना रुग्ण वाढणाऱ्या नागपुरातही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबद्दल माहिती दिली आहे.