अनेक विभागांना ५० टक्के  चाचण्या करणेही मुश्कील

मुंबई : करोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी मुंबईत दररोज ५० हजार चाचण्या करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. मात्र गेल्या दोन दिवसात पालिके च्या सर्व विभागांना मिळून ५० टक्के  चाचण्यांही करता आलेल्या नाहीत. प्रतिजन चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचेही आदेश देण्यात आले होते. परंतु सोमवार आणि मंगळवारी अनुक्रमे १५ हजार आणि १७ हजार चाचण्या करण्यात आल्या. यामुळे मुंबईतील एकू ण चाचण्यांचे प्रमाण वाढले असून दैनंदिन रुग्णांची संख्या पाच हजाराच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे.

मुंबईतील करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी गेल्या आठवडय़ात दिले होते. सध्या मुंबईत २० हजारापर्यंत चाचण्या केल्या जात आहेत. मात्र या चाचण्यांचे प्रमाण ५० हजारापर्यंत नेण्याचे लक्ष्य पालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार विभाग कार्यालयांना चाचण्यांचे लक्ष्य ठरवून देण्यात आले होते. मॉल, रेल्वे टर्मिनस, एस टी आगार, तसेच पर्यटन स्थळे, बाजार, खाऊगल्ल्या, उपाहारगृहे अशा गर्दीच्या ठिकाणी प्रतिजन चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार प्रत्येक मॉलमध्ये ४०० चाचण्या, एस डी आगार, रेल्वे टर्मिनस, पर्यटनस्थळी प्रत्येकी १००० चाचण्या असे लक्ष्य ठरवून दिले होते. मात्र गेल्या दोन दिवस मात्र पालिके च्या २४ विभागात मिळून केवळ १५ ते १७ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत.

सर्वाधिक चाचण्यांचे लक्ष्य बोरिवलीत देण्यात आले होते. या ठिकाणी बाहेरगावी येणाऱ्या गाडय़ांसाठी बोरिवली स्थानकात थांबा दिला जातो, तसेच या ठिकाणी दोन मॉल आहेत. एक एसटी आगार आहे. त्यामुळे आर-मध्य विभागाला सर्वात जास्त म्हणजे ३८०० चाचण्यांच लक्ष्य ठरवून देण्यात आले होते. तर त्याखालोखाल ग्रॅंटरोडमध्ये ३६००, कु र्ला विभागात ३४००, भायखळ्यात ३००० चाचण्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र बहुतांशी विभागांना पहिल्या दोन दिवसात ५० टक्के  लक्ष्य गाठता आले आहे.

 

जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटीवरही चाचण्या

चाचण्या वाढवताना पालिके च्या विभाग कार्यालयांना गर्दीच्या ठिकाणी प्रतिजन चाचण्या वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याअंतर्गत गर्दीची ठिकाणे व विभागातील पर्यटनस्थळे निवडून त्या ठिकाणी चाचण्या वाढवण्यात येत आहेत. त्यानुसार उद्याने, बाजार येथेही चाचण्या के ल्या जाणार आहे. ग्रँटरोड परिसरात गिरगाव चौपाटी, प्रियदर्शिनी उद्यान, कमला नेहरू उद्यान येथे तर अंधेरीत जुहू चौपाटी येथेही चाचण्या के ल्या जात असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. इतर विभागांनाही त्यांच्याकडील गर्दीची ठिकाणे निवडून तेथ चाचण्या वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सर्वाधिक चाचण्या कुर्ल्यामध्ये

विभाग कार्यालयांना दिलेल्या चाचण्यांच्या उद्दिष्टांप्रमाणे कु र्ला विभागात सर्वाधिक चाचण्यांचे लक्ष्य गाठता आले आहे. या विभागात दोन दिवसात ५२४३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर भांडूप, घाटकोपर, मुलुंडमधून  रुग्णांची संख्या आधीच जास्त असताना या विभागात चाचण्या मात्र कमी झाल्या आहेत.