पशुवैद्यकांचे स्पष्टीकरण

मुंबई : करोनाचा प्रसार प्राण्यांमुळे होत असल्याचे पुरावे नाहीत,’ असे पशुवैद्यकांनी स्पष्ट केले आहे. मात्र, प्राणी हाताळल्यावर हात स्वच्छ धुणे आवश्यक असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.

करोनाचा प्रसार प्राण्यांमुळे होत असल्याच्या गैरसमजातून प्राण्यांना सोसायटय़ांबाहेर हाकलून देण्याचे प्रकार सुरू आहेत. पाळीव प्राणी फिरवण्यासही काही ठिकाणी मज्जाव करण्यात आला आहे. मात्र, करोना प्राण्यांच्या माध्यमातून पसरत नसल्याचे पशुवैद्यकांनी स्पष्ट केले आहे. पाळीव प्राणी किंवा शेतीसाठीचे प्राणी यांच्यामुळे करोना पसरत नाही. मात्र, त्याचवेळी इतर कोणता प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्यक स्वच्छता राखणे आवश्यक आहे.

प्राण्यांना हात लावल्यानंतर, खाणे घातल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत. प्राण्यांचा वावर असलेल्या जागा स्वच्छ ठेवाव्यात. त्यांना फिरवायला नेल्यानंतर प्राणी चुकीच्या गोष्ट खाणार किंवा चाटणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे पशुवैद्यांनी सांगितले.

याबाबत पशुवैद्य डॉ.जे. सी. खन्ना यांन सांगितले, ‘प्राण्यांमुळे करोना होत असल्याचे किंवा पसरत असल्याचे कोणतेही पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत. त्याचप्रमाणे प्राण्यांना माणसामुळे या विषाणूची लागण होत असल्याचेही समोर आलेले नाही. प्राण्यांबरोबर काम करताना अनेक विषाणूंचा धोका असतोच. मात्र, करोना प्राण्यांमुळे होत नाही. असे असले तरी ज्यांच्या घरी प्राणी आहेत त्यांनी किंवा प्राणी हाताळल्यानंतर आवश्यक काळजी घेणे, स्वच्छता राखणे आवश्यक आहे.’