करोना प्रादुर्भाव, टाळेबंदीमुळे मागणीत ६० टक्क्यांहून अधिक घट

मुंबई :  गेल्या वर्षी पाडव्याच्या तोंडावरच टाळेबंदी लागू झाली होती आणि आताही काहीशी तशीच स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी यंदाचा पाडवा मिठाई दुकानदारांसाठी कडू ठरण्याची चिन्हे आहेत. अत्यावश्यक सेवांमध्ये खाद्यपदार्थ आणि मिठाई विक्रेत्यांना परवानगी मिळाली आहे. मात्र नागरिकांमध्ये निरुत्साहाचे वातावरण असल्याने मिठाईच्या मागणीत ६० टक्क्यांहून अधिक घट झाल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. तसेच करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा नागरिकांच्या मनावर परिणाम होत असल्याने सध्या दुकाने ओस पडल्याची खंतही या मंडळींनी व्यक्त केली आहे.

श्रीखंड, आम्रखंड, आमरस, खवा अशा गोडाधोडाशिवाय मराठी नववर्षांचे स्वागत पूर्ण होत नाही, परंतु यंदा करोनामुळे लोकांनी गोडाकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. ‘मिठाईची दुकाने सुरू असली तरी इतर बाजारपेठ बंद आहेत. लोकांचे घराबाहेर पडणे बाहेर कमी झाल्याने याचा थेट व्यवसायावर परिणाम झाला आहे. गेले काही दिवस मागणी कमी झाल्याने उत्पादन कमी झाले. हाताला पुरेसे काम नसल्याने कामगारही गावी जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पाडव्याला तुलनेने २५ ते ३० टक्केच मागणी असण्याची शक्यता ‘चंदू हलवाई’चे प्रतिनिधी भारती सिंग यांनी वर्तवली.

‘शनिवार-रविवार संचारबंदी असल्याने मंगळवारी आलेल्या पाडव्यासाठी सोमवारी दुकान खुले ठेवावे लागेल. विक्रीसाठी एकच दिवस हातात असल्याने मर्यादित विक्री होईल. याचा अंदाज घेऊन केवळ ५० टक्के मिठाई तयार करण्यात येईल. विशेष म्हणजे पाडव्याला पूजा, समारंभ असे अनेक सामूहिक सोहळे होतात. यंदा त्यावरही बंदी असल्याने मोठे नुकसान झाले आहे,’ असे ‘चांदेरकर स्वीट’चे राजेंद्र खांबकर यांनी सांगितले.

कामगार परतीच्या वाटेवर

मिठाईच्या छोटय़ा दुकानात किमान पाच ते आठ कामगार, तर मोठय़ा व्यावसायिकांकडे ५० ते १०० कामगार काम करतात. कठोर र्निबधांची चिन्हे दिसताच अनेक कामगारांनी गावची वाट धरली आहे, तर काही कामगार गावी जाण्याच्या मार्गावर आहेत. मागणी कमी झाल्याने काम नाही. त्यामुळे कामगारांना गावी पाठवणे सोयीस्कर ठरत असल्याचे ठिकठिकाणच्या हलवायांचे म्हणणे आहे.

वस्तू महागल्या

शिथिलीकरणानंतर तेलाच्या दारात चांगलीच वाढ झाली आहे. शिवाय दुधही प्रतिलिटर चार ते पाच रुपयांनी महागले आहे. कच्चा माल महाग झाला असला तरी पदार्थाचे भाव वाढलेले नाहीत. सद्य:स्थितीत आर्थिक अडचणींमुळे ग्राहकांची क्रयशक्ती कमी झालेली आहे. त्यामुळे ग्राहकांचा कल लक्षात घेऊन विक्रेत्यांनी भाववाढ केलेली नाही.

नुकताच होळीचा सण होऊन गेला, पण होळीची ‘पुरणपोळी’ काही मनासारखी विकली गेली नाही. दरवर्षीच्या तुलनेत यंदा होळीला केवळ ४० टक्के पुरणपोळीची विक्री झाली. अशीच स्थिती पाडव्याला असणार आहे. लोकांमध्ये निरुत्साही वातावरण असल्याने लोक श्रीखंड आणि मिठाई खरेदीकडे फारसे फिरकणार नाहीत. त्यामुळे पाडव्याचा सणही सुनाच जाण्याची शक्यता आहे.

– कमलाकर राक्षे, लाडू सम्राट