News Flash

करोना रुग्णांना आपलेपणा देणारे उपचारकेंद्र

महिला शिक्षणासाठी अग्रेसर असलेल्या या संस्थेमध्ये सेवाकार्याचे अनोखे दर्शन घडत आहे.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील करोना काळजी केंद्रामध्ये रुग्णांसाठी सायंकाळी मनोरंजनासह समुपदेशन असे उपक्रम राबविले जातात.

|| विद्याधर कुलकर्णी

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेकडून सेवाकार्याचा अनुसरणीय आदर्श

पुणे : दररोज सकाळी चहा – न्याहारी, त्यानंतर प्राणायाम आणि हास्ययोगाची प्रात्यक्षिके, डॉक्टरांकडून नियमित तपासणी, सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमासह नैराश्यामध्ये असलेल्या व्यक्तींचे तज्ज्ञांकडून समुपदेशन, रात्रीचे भोजन… अगदी घरच्यासारखी सेवा-शुश्रूषा करणारी ही दिनचर्या आहे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील करोना काळजी केंद्रामध्ये दाखल  झालेल्या पावणेतीनशे रुग्णांची.

महिला शिक्षणासाठी अग्रेसर असलेल्या या संस्थेमध्ये सेवाकार्याचे अनोखे दर्शन घडत आहे. समर्थ भारत योजनेद्वारे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये गुढीपाडव्यापासून करोना काळजी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीने पुढाकार घेतला आहे. यातील वैद्यकीय भाग सह््याद्री हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी स्वीकारला आहे. आठ डॉक्टर आणि तीन पाळ्यांमध्ये काम करणारे २५ स्वयंसेवक कार्यकर्ते रुग्णांना वैद्यकीय आणि आवश्यक सुविधा देत आहेत. आवश्यकता भासल्यास रुग्णांना पुढे रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्राचे समन्वयक महेश पोहनेरकर यांनी दिली.

पुणे महापालिका, विवेक व्यासपीठ, पीपीसीआर (पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स), सह््याद्री हॉस्पिटल, लोहिया परिवाराचे श्री मुकुंद भवन ट्रस्ट, लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट, परिमल आणि प्रमोद चौधरी फाऊंडेशन या संस्थांचे सहकार्य करोना काळजी केंद्राला लाभले आहे.

 

दिनचर्या…  करोना काळजी केंद्रामध्ये दाखल झालेल्या रुग्णांचे  शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी दिनचर्या तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये सकाळचा चहा, न्याहरी, दोन्ही वेळचे जेवण, औषधे, प्राणायाम या गोष्टींचा समावेश आहे.

उपयुक्तता… कर्वेनगर येथील बाया कर्वे वसतिगृहामध्ये सुरू करण्यात आलेल्या केंद्रामध्ये साडेचारशे खाटांची सुविधा करण्यात आली आहे. सुरक्षित अंतराच्या निकषांचे पालन करण्याच्या उद्देशातून एका खोलीत तीन रुग्णांची व्यवस्था आहे. कोणतीही लक्षणे नसलेल्या, पण करोना झालेल्या आणि घरात सुविधा नसलेल्या, पण विलगीकरण आवश्यक आहे अशा रुग्णांसाठी हे केंद्र उपयुक्त ठरत आहे.

 

या केंद्राची वैशिष्ट्ये

– सह्याद्री हॉस्पिटलचे डॉक्टर रुग्णांच्या तब्येतीची काळजी घेण्यास सजग आहेत.

– केंद्रामध्ये संपूर्ण स्वयंसेवी पद्धतीने स्वयंसेवक कार्यरत आहेत. त्यांना त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले आहे.

– आठ दिवस काम केल्यानंतर स्वयंसेवकांना आठ दिवस विलगीकरणात ठेवण्यात येत आहे.

भीषण विषाणू पर्वातही समाजातील काही नागरिक आणि संस्था करोना रुग्णांच्या अडचणी-समस्या सोडविण्यासाठी चांगली कामे करीत आहेत. वैद्यकीय मदतीसाठी ज्ञात नसलेल्या सामाजिक संस्था काळजी केंद्र उभारून रुग्णांच्या वेदनांवर फुंकर घालत आहेत. राज्यभरातील अशा संस्थांच्या योगदानाची दखल आजपासून ‘पीड़ पराई जाने रे…’ या वृत्तमालिकेतून…

तरुणांचा उत्स्फूर्त पुढाकार…

या संस्थेत सेवाभावाचा नवा आदर्श तरुण स्वयंसेवकांनी सर्वांसमोर ठेवला आहे. डॉक्टरांना मदत करण्यासाठी तीन पाळ्यांमध्ये प्रत्येकी २५ स्वयंसेवकांची फळी उभारण्यात आली आहे. हे स्वयंसेवक रुग्णांची अत्यंत आस्थेने चौकशी आणि शुश्रूषा करीत आहेत. तसेच स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी युवकांची प्रतीक्षा यादी करावी लागली आहे, इतके तरुण येथे सेवा योगदान देण्यास इच्छुक आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 1:39 am

Web Title: corona patient acupuncture treatment center akp 94
Next Stories
1 दहावीच्या मूल्यमापनाबाबत संदिग्धता
2 मुंबई, ठाण्यात रुग्णवाढीचा आलेख घसरणीला
3 राज्यातील  एकूण बाधित ५० लाखांवर
Just Now!
X