News Flash

मुंबईतील रुग्णसंख्येत हजाराने घट

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबईमधील रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत होत.

ठाणे  रेल्वे स्थानकात  शनिवारी ओळखपत्र पाहूनच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जात होता. (छाया- दीपक जोशी)

शहरात दिवसभरात ५,८८८ जणांना बाधा, ७१ रुग्णांचा मृत्यू

मुंबई : मुंबईमधील रुग्णसंख्या शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी सुमारे एक हजाराने कमी झाली असून शनिवारी दिवसभरात ५,८८८ जणांना करोनाची बाधा झाली. तर ७१ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे करोनावाढीचा दर १.२६ टक्क्यांवर, तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५४ दिवसांवर पोहोचला आहे. दरम्यान, हळूहळू वाढणारे मृत्यूचे प्रमाण चिंतेची बाब बनली आहे.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबईमधील रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत होत. मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. मुंबईमध्ये शनिवारी ५,८८८ जणांना बाधा झाल्यानंतर एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या सहा लाख २२ हजार १०९ वर पोहोचली आहे. विविध रुग्णालयातील ७१ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत करोनाने मृत्युमुखी पडलेल्या मुंबईकरांची संख्या १२ हजार ७१९ वर पोहोचली आहे.

विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे ८,५४९ रुग्ण शनिवारी करोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत मुंबईतील पाच लाख २९ हजार २३३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ८५ टक्क्यांवर पोहोचले आहे. आजघडीला विविध रुग्णालयांमध्ये ७८ हजार ७७५ रुग्ण उपचार घेत आहेत.

करोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी दररोज ५० हजार चाचण्या करण्याचे उद्दिष्ट पालिकेने निश्चित केले आहे. मात्र शनिवारी ३९ हजार ५८४ चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे रुग्णसंख्या कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले. आतापर्यंत ५२ लाख तीन हजार ४३६ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या गटातील तब्बल २४ हजार ९१७ संशयित रुग्णांचा शोध घेण्यात आला असून यापैकी ९८४ संशयित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रांमध्ये ठेवण्यात आले आहे. करोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे मुंबईतील १२२ परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत, तर १,२११ इमारती आणि ११ हजार ५२६ मजले टाळेबंद करण्यात आले आहेत.

ठाणे जिल्ह्यात ५ हजार १९२ करोना रुग्ण

ठाणे : ठाणे जिल्ह्यात शनिवारी ५ हजार १९२ करोना रुग्ण आढळून आले. तर ४६ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ४६ हजार ३७६ करोनाबाधित आढळून आले, तर ७ हजार २३२ जणांचा मृत्यू झाला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2021 12:52 am

Web Title: corona patient in mumbai akp 94
Next Stories
1 राज्यातील रुग्णसंख्या स्थिरावली
2 बिगरझोपडपट्टी परिसरात प्रतिपिंडांचे प्रमाण अधिक
3 अनिल देशमुख यांच्यावरील छाप्यांवरून आरोप-प्रत्यारोप
Just Now!
X