मुंबई : मुंबईत शनिवारी ८६६ नवीन रुग्णांची नोंद झाली तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला. तर एका दिवसात १०४५ रुग्ण करोनामुक्त झाले. मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.१३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधी ५११ दिवसांपर्यंत वाढला आहे. शुक्र वारी २६ हजाराहून अधिक चाचण्या करण्यात आल्या असून बाधितांचे प्रमाण ३.२४ टक्के  आहे.

शनिवारी ८६६ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ७ लाख १० हजारापुढे गेली आहे. एका दिवसात १०४५ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत ६ लाख ७७ हजाराहून अधिक  म्हणजेच ९५ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.  त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या चांगलीच घटली आहे. सध्या १६ हजार १३३ उपचाराधीन रुग्ण आहेत.

करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबईतील चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले होते. शुक्रवारी २६ हजार ६६९ चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी चार टक्क्यांपेक्षा कमी नागरिक बाधित आढळले आहेत. आतापर्यंत ६३ लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.  मुंबईतील रुग्णवाढीचा दर  ०.१३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधीही ५११ दिवसांवर पोहोचला आहे.

मृतांची एकूण संख्या १५ हजारापुढे

शनिवारी २९  रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे गेल्या वर्षभरातील करोना मृतांची एकू ण संख्या १५,०१८ झाली आहे. २९ रुग्णांपैकी २० रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये १४ पुरुष व १५ महिला होत्या. ३ रुग्णाचे वय ४० वर्षांखाली होते. १४ रुग्णांचे वय ६० वर्षांवर होते, तर १२ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते.

राज्यात १३, ६५९ रुग्ण ३०० जण दगावले

मुंबई : राज्यातील करोना बाधितांची संख्या झपाट्याने कमी होत असून शनिवारी गेल्या तीन महिन्यातील सर्वात कमी म्हणजे १३ हजार ६५९ नवीन बाधितांची नोंद झाली. तर २१ हजार ७७६ रूग्णांनी करोनावर मात के ल्याने राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५ टक्के  झाले आहे.  बाधितांचा आकडा घटत असला तरी मृत्यूचे प्रमाण अजूनही अधिक असून दिवसभरात ३०० जणांचा मृत्यू झाला.

सध्या राज्यात १ लाख ८८ हजार  रुग्ण उपचाराधीन आहेत. तसेच १४ लाख ५२ व्यक्ती गृह अलगीकरणात तर ७ हजार ९३ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक १३४८ नवीन रूग्णांची नोंद झाली असून त्या खालोखाल कोल्हापूरमध्ये १०९५ तर सांगली ७५९ बाधितांची नोंद झाली.