३०० रहिवाशांची तयारी, पालिकेची विशेष मोहीम सुरू

मुंबई : करोनावर नियंत्रण मिळवण्यात मोठे यश मिळवणाऱ्या धारावीकरांनी आता अन्य करोनाबाधितांवर यशस्वी उपचार होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. धारावीतील सुमारे ३०० रहिवाशांनी रक्तद्रव (प्लाझ्मा) दान करण्याची तयारी दर्शवत एक पाऊल पुढे टाकले आहे. यापैकी ४७ जणांच्या रक्ताचे नमुने गुरुवारी घेण्यात आले.

धारावीमधील डॉ. बालिगा नगरमध्ये १ एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळला आणि पालिका अधिकाऱ्यांची झोपच उडाली. अल्पावधीतच धारावीमध्ये करोनाचा संसर्ग वाढू लागला. मात्र खासगी डॉक्टर, सामाजिक संस्थांनी धारावीकरांसाठी धाव घेतली आणि पालिकेच्या मदतीने धारावीकरांच्या बचावासाठी निरनिराळ्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या. आतापर्यंत धारावीमधील तब्बल दोन हजार ५१३ जणांना करोनाची बाधा झाली आहे. बरे झाल्यामुळे दोन हजार १२१ जणांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले असून त्यामध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. आजघडीला केवळ १४२ सक्रिय रुग्ण आहेत.

करोनातून बऱ्या झालेल्यांचे रक्तद्रव घेऊन त्याद्वारे करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेने त्यासाठी करोनातून मुक्त झालेल्यांना आवाहनही केले आहे. मात्र अद्याप रक्तद्रव दानासाठी बरे झालेले रुग्ण पुढे येत नसल्याचे निदर्शनास आले आहे.  असे असताना धारावीकरांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. करोना संसर्गातून मुक्त झालेल्या धारावीमधील रहिवाशांबरोबर पालिकेने संपर्क साधण्यास सुरुवात केली होती. साधारण ५०० जणांशी संपर्क झाला असून त्यापैकी ३०० जणांनी रक्तद्रव देण्याची तयारी दर्शविली आहे. या सर्वाच्या रक्ताचे नमुने घेण्यात येणार असून त्यांची तपासणी झाल्यानंतर संबंधितांना रक्तद्रव दानासाठी बोलावण्यात येणार आहे. रक्ताचे नमुने घेण्यासाठी धारावीतील कामगार स्कूलमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शिबिरात गुरुवारी सुमारे ४७ जणांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले.

धारावीतील दोन हजार ११६ रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये तरुणांची संख्या अधिक आहे. या सर्वाशी संपर्क साधून रक्तद्राव दानाबाबत विचारणा करण्यात येत आहे. रक्तद्राव देण्यास तयार असलेल्यांच्या रक्ताचे नमुने गुरुवारपासून घेण्यात येत आहेत. कोणताही अन्य आजार नसलेल्या, निकषात बसणाऱ्या व्यक्तीचे रक्तद्राव घेऊन अन्य रुग्णांवरील उपचारासाठी त्याचा वापर करण्यात येईल.

किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त, ‘जी-उत्तर’