मुंबई : मुंबईतील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली असून मृतांचा आकडाही कमी होऊ लागला आहे. मुंबईत शनिवारी १,०४८  नवीन रुग्णांची नोंद झाली असून २५ रुग्णांचा मृत्यू झाला.

शनिवारी १,०४८ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ७ लाख ४ हजार ५०९ झाली आहे. एका दिवसात १ हजार ३५९ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत ६ लाख ५९ हजाराहून अधिक  म्हणजेच ९४ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे हा दर ७९ टक्यांपर्यंत कमी झाला होता. तो आता पुन्हा ९४ टक्के  झाला आहे.  मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्याही आता कमी होऊ लागली आहे. ही संख्या ९२ हजारांपुढे गेली होती. ती आता २७ हजार ६१७ झाली आहे. त्यापैकी ६८ टक्के  म्हणजेच १९ हजार १२६ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत, तर २७ टक्के  म्हणजेच सुमारे ७  हजार ५०० रुग्णांना लक्षणे आहेत. गंभीर रुग्णांची संख्या १ हजार २९७ इतकी आहे.

करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबईतील चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले होते. दर दिवशी ४५ ते ५० हजार चाचण्या के ल्या जात होत्या. आता चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र बाधितांचे प्रमाणही घटले आहे. शुक्रवारी  २६,७५१ चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी सुमारे ३.९१ टक्के  नागरिक बाधित आढळले आहेत. आतापर्यंत ६२ लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या असून मुंबईतील रुग्णवाढीचा दर  ०.१७ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधीही ३९९ दिवसांवर पोहोचला आहे.  शनिवारी २५ रुग्णांच्या मृत्युची नोंद झाल्यामुळे मृतांची एकू ण संख्या १४ हजार ८३३ झाली आहे.  १५ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये १५ पुरुष व १० महिला होत्या. ६ रुग्णांचे वय ४० वर्षांखाली होते. १३ रुग्णांचे वय ६० वर्षांवर होते.

ठाणे जिल्ह्यात दिवसभरात ६९५  रुग्ण

ठाणे : ठाणे जिल्ह्यात शनिवारी ६९५ करोना रुग्ण आढळून आले, तर ५२ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील ६९५ करोना रुग्णांपैकी कल्याण डोंबिवलीत १९३, ठाणे १३३, ठाणे ग्रामीण १०८, नवी मुंबई १०१, मिरा भाईंदर ६६, उल्हासनगर ३८, अंबरनाथ २६, बदलापूर २२ आणि भिवंडीत आठ रुग्ण आढळून आले. तर ५२ मृतांपैकी कल्याण डोंबिवली २३, ठाणे ग्रामीण नऊ, ठाणे सहा, नवी मुंबई सहा, मिरा भाईंदर तीन, अंबरनाथ दोन, बदलापूर एक, उल्हासनगर एक आणि भिवंडीत एकाचा मृत्यू झाला.