संदीप आचार्य

मुंबई: मुंबईत सात बड्या रुग्णालयांनी यशोदाबेनना(बदलेलं नाव) बाळंतपणासाठी दाखल करून घेण्यास नकार दिला. वेळ रात्रीची. एकही मोठं रुग्णालय उपचार करण्यास तयार नव्हते कारण यशोदाबेनला(बदललेलं नाव) करोना तर होताच शिवाय तिच ह्रदयाचं कार्य केवळ २० टक्के सुरु होतं. अखेर रुग्णवाहिकेतून त्या पालिकेच्या नायर रुग्णालयात आल्या तेव्हा रुग्णवाहिकेतच बाळंत होणार अशी स्थिती निर्माण झाली होती. नायरच्या डॉक्टरांनी तातडीने हालचाल केली आणि रात्रीच त्यांच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांनी तीन मुलांना जन्म दिला असून आई व मुलं अशा सगळ्यांची प्रकृती उत्तम असल्याच रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.

“वांद्रे येथील श्रीमंत कुटुंबातील यशोदाबेन (बदलेलं नाव) या बाळंतपणासाठी तपासणी करायला नेहमीच्या रुग्णालयात गेल्या तेव्हा त्यांना करोना असल्याचे आढळून आले. मुळात त्यांचे ह्रदय कमकुवत होते. त्यात करोना झाल्याचे आढळताच डॉक्टरांनी मोठ्या रुग्णालयात जाण्यास सांगितले. बाळंतपणाची वेळ जवळ आली होती. त्यांच्या घरातील लोकांनी तातडीने मोठ्या रुग्णालयांशी संपर्क साधायला सुरुवात केली तशी प्रत्येकाने नन्नाचा पाढा वाचायला सुरुवात केली. शेवटी त्यांना रुग्णवाहिकेत घालून सात पंचतारांकित रुग्णालयांमध्ये गेले मात्र तेथेही नकार मिळाल्यानंतर अखेरचा उपाय म्हणून त्या नायर रुग्णालयात आल्या” असे डॉ मोहन जोशी यांनी सांगितले.

ज्यावेळी त्या रुग्णालयात आल्या तेव्हा त्यांच बाळंतपण रुग्णवाहिकेतच होणार की काय अशी परिस्थिती होती. स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ अरुंधती यांच्या पथकाने तातडीने त्यांना विभागात हलवले तसेच ह्रदयविकार विभागाचे प्रमुख डॉ अजय चौरासिया यांच्या टिमने त्याची तपासणी केली. रात्री उशीरा त्यांना शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले तेव्हा सर्व डॉक्टरांच्या मनात एक अस्वस्थता दाटून आली होती. कारण यशोदाबेनच्या (बदलेलं नाव) हृदयाचे कार्य केवळ २० टक्के सुरू होतं. अशा परिस्थितीत सिझेरियन करणे हे एक मोठेच आव्हान होते. अॅनॅस्थेशिया विभागाच्या प्रमुख डॉ चारुलता देशपांडे , डॉ अरुंदती तसेच हृदयविकार विभागाचे डॉक्टर यांनी काळजीपूर्वक सिझेरियनची सिद्धता केली. अखेर सिझेरियन शस्त्रक्रिया यशस्वी होऊन तिने तिळ्यांना जन्म दिला.

हृदयविकार आणि त्यात करोना हे एक मोठेच आव्हान होते. पण नायरच्या डॉक्टरांनी टीमवर्क करून ते आव्हान यशस्वीपणे पेलले. या सर्व डॉक्टरांचे अभिनंदन करू तेवढे थोडेच असल्याचे डॉ. मोहन जोशी म्हणाले. मुंबईत पंचतारांकित रुग्णालयांनी उपचार नाकारलेले हे बाळंतपण आम्ही यशस्वी केले असेही ते म्हणाले. करोनाच्या गेल्या दोन महिन्यात दररोज स्त्री रोग उपचार विभागात तीन ते चार बाळंतपण होत असतात. आतापर्यंत करोना असलेल्या एकूण ५३ महिलांची यशस्वीपणे बाळंतपण करण्यात आली असून यातील १० महिलांच्या सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे डॉ मोहन जोशी यांनी आवर्जून सांगितले. करोनाच्या लढाईत नायर रुग्णालयातील प्रत्येक विभाग जीवाची बाजी लावून काम करत असून तिळ्यांचा सुखरूप जन्म झाल्याने नायरच्या डॉक्टरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.