संदीप आचार्य 
मुंबई : करोनाच्या लढाईत गेले पाच महिने अविश्रांत काम करणारे डॉक्टर व परिचारिका यांचे मनोबल टिकवून धरण्याची एकीकडे नितांत गरज आहे तर दुसरीकडे रुग्णामधील भीती व एकाकीपणातून निर्माण होणारी अवस्थता दूर करण्यासाठी यापुढे मानसिक समुपदेशनाबरोबरच आवश्यकतेनुसार औषध योजना करण्याच्या शिफारशी करोना वरील उपाययोजनांसाठी नेमलेल्या ‘टार्क फोर्स’ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे झालेल्या बैठकीत केल्या आहेत. या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्याबरोबरच ‘टास्क फोर्स’ मध्ये मानसोपचारतज्ज्ञांची नियुक्तीही करण्यात येणार आहे.

गेले पाच महिने महापालिका व राज्य सरकारच्या रुग्णालयात डॉक्टर व परिचारिकांसह सर्वच आरोग्य कर्मचारी अखंड लढत आहेत. या लढाईत अनेक डॉक्टरांचे करोनामुळे मृत्यू झाले तर शेकडो डॉक्टर- परिचारिकांसह आरोग्य कर्मचार्यांना करोनाची लागणही झाली. या सर्वांचा प्रचंड ताण आज आरोग्य व्यवस्थेतील सर्वांवर जसा येत आहे तसाच या डॉक्टर- परिचारिकांच्या घरच्यांनाही येत आहे. घरच्यांना वाटणाऱ्या काळजीतून उपचार करणार्या डॉक्टर- परिचारिकांमधील तणावही कमालीचा वाढत आहे. एकीकडे आरोग्य कर्मचार्यांची ही कथा तर दुसरीकडे करोना रुग्णामधील भीती व विलगीकरणातून येणारे एकाकीपण व नैराश्य ही वेगळीच चिंता असून या सर्वातून योग्य मार्ग काढून उपाययोजना करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन महिन्यांपूर्वी आरोग्य विभाग व टास्क फोर्स ला सांगितले होते.

त्यानुसार आरोग्य विभागाने १ मे रोजी संचालिका डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सात मानसिक तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली. या समितीने आपला अहवाल आरोग्य विभागाला सादर केला असून त्यानुसार आरोग्य विभागाने आपल्या उपाययोजना सुरुही केल्या आहेत. यात समुपदेशन व समन्वय तसेच डॉक्टरांना पुरेशी विश्रांती आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन आदीचा समावेश आहे. तथापि मुंबईतील वाढती रुग्णसंख्येमुळे रुग्णांची मानसिकता तसेच डॉक्टर- परिचारिकांचे मानसिक आरोग्य यासाठी वेगळा विचार करावा लागणार हे लक्षात घेऊन दोन आठवड्यांपूर्वी ‘मुंबई टास्क फोर्स’ने काही मानसिक तज्ज्ञांशी सखोल चर्चा केली.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांनी टास्क फोर्स समोर याबाबत सादरीकरणही केले. यानंतर टास्क फोर्सने आपला अहवाल तयार करून त्यावर काल सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे झालेल्या बैठकीत सखोल चर्चा झाली. यावेळी पालिका आयुक्त चहल, अतिरिक्त आयुक्त, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने तसेच टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांच्यासह टास्क फोर्स चे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी डॉ. संजय ओक यांनी डॉक्टर व करोना रुग्णांना समुपदेशन आदीबरोबर मानसोपचारतज्ज्ञांनी सुचवलेली औषधे देण्याची गरज असल्याचे तसेच टास्क फोर्सची शिफारस असल्याचे आग्रहपूर्वक सांगितले.

बऱ्याच प्रकरणात विलगीकपणामुळे रुग्णांना एकटे पाडल्यासारखे तसेच नाकारलेपणाची भावना निर्माण झाल्याचे दिसून येते. नैराश्याची भावना निर्माण होताना दिसते. यावर मानसिक उपचारासाठी दिली जाणारी औषधे दिल्यास निश्चित उपयोग होईल, असा विश्वास टास्क फोर्सचा असल्याचे डॉ. ओक यांनी या चर्चेत सांगितले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औषध योजनेला मान्यता देतानाच टास्क फोर्समध्ये मानसोपचारतज्ज्ञांचा समावेश करण्यास सांगितले असून लवकरच एकदोन मानसोपचारतज्ज्ञांचा या टास्क फोर्स मध्ये समावेश केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. रुग्णांबरोबरच डॉक्टर व परिचारिकांचाही प्राधान्याने विचार करण्याची गरज असून कौटुंबिक तणावासह सतत करोनाच्या वातावरणातूनही एक चिडचिड या सर्वांमध्ये निर्माण झाली असल्याचे टास्क फोर्सच्या एका सदस्याने सांगितले.