संदीप आचार्य

मुंबईत गेले तीन दिवस करोनाचे दोन हजाराहून अधिक रुग्ण सापडत असून मृत्यू होणाऱ्या करोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. गेल्या चोवीस तासात मुंबईत ४३ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकट्या मुंबईत ८०० रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने बीकेसीत १०२८ रुग्णांसाठीची व्यवस्था पूर्ण केली असून शुक्रवारपासून या ठिकाणी करोना रुग्णांना दाखल करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय मुंबईत वेलिंग्टन क्लबसह वेगवेगळ्या ठिकाणी १० हजार खाटांची व्यवस्था अंतिम टप्प्यात आली आहे.
करोनाची लागण असलेल्या व थोडे गंभीर असलेल्या रुग्णांना वांद्र्याच्या बीकेसी येथील नव्याने तयार करण्यात आलेल्या रुग्ण व्यवस्थेत शुक्रवारपासून दाखल केले जाणार आहे.

“या ठिकाणी १०२८ खाटांची व्यवस्था करण्यात आली असून या १०२८ खाटांपैकी पन्नास टक्के खाटांच्या ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे दिसून आली आहे व ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे अशा रुग्णांना येथे दाखल केले जाणार आहे” असे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. “येथे आयसीयूची गरज असलेल्या गंभीर रुग्णांची व्यवस्था बीकेसीतील एशियन हार्ट हॉस्पिटलमधील आयसीयूत केली जाणार आहे” असे त्यांनी सांगितले. “याशिवाय गोरेगाव येथील नेस्कोमध्ये १००० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून लवकरच येथे एकूण २६०० खाटांची व्यवस्था केली जाईल”, असेही सुरेश काकाणी यांनी सांगितले.

“याचप्रमाणे वरळी व महालक्ष्मी येथे एक हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली असून येथे आयसीयू खाटाही तयार करण्यात आल्या आहेत. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे या कामांचा नियमित आढावा घेत असून वरळी व बीकेसीत रुग्ण व्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांनी सर्व प्रकारची मदत केल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. आम्हाला येणाऱ्या अडचणी समजून घेऊन आर्थिक मदतीसह संबंधित यंत्रणांना फोन करून ते कामाला गती देत असल्यानेच वेगाने हजारो खाटांची व्यवस्था उभी राहाण्यास मोठी मदत होत आहे” अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. वेलिंग्टन क्लब येथे ४०० खाटा तयार करण्यात येत असून दहिसर ते मुलुंड दरम्यान एकूण दहा हजार खाटांची व्यवस्था आता अंतिम टप्प्यात आल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.

“दहा हजार खाटांची निर्मिती करताना त्यासाठी लागणारे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण विभागावर सोपविण्यात आली आहे. यापूर्वी सेव्हन हिल्स येथे वर्धा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ५७ निवासी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून आता बीकेसीतील हजार खाटांसाठी अंबेजोगाई येथील निवासी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे” असे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.

“साधारणपणे शंभर खाटांमागे बारा डॉक्टर व सोळा परिचारिका व कंत्राटी चतुर्थ श्रेणी कर्मचारी असे मनुष्यबळ लागणार असून त्याची व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी पंधराशे आयुष डॉक्टरांची नोंदणी करण्यात आली असून आम्ही काढलेल्या आदेशाला प्रतिसाद म्हणून साडेचार हजार डॉक्टरांनी आमच्याकडे नोंदणी केली आहे. तसेच पालिकेच्या नायर, केईएम व शीव तसेच जे जे रुग्णालयातील परिचारिका प्रशिक्षण केंद्रातील तिसर्या वर्षाच्या २०० हून अधिक परिचारिका उपलब्ध होतील. या परिचारिका म्हणून काम करणार्यांना २० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे” असे डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. “जेवढे डॉक्टर, परिचारिका तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल त्या सर्वांना करोनाच्या लढाईसाठी दोन दिवसांचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे” असेही डॉ. लहाने यांनी सांगितले.

एका करोना रुग्णामागे दहा संपर्क लोकांचा शोध घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त इक्बाससिंग चहेल यांनी दिले आहेत. करोना रुग्णांच्या संपर्कात आलेले लोक शोधण्याची मोहीम गतिमान करण्यामागे करोनाची साखळी तोडणे हा प्रमुख उद्देश असून यातून जास्तीतजास्त लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन करता येईल, हा असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

पावसाळ्यापूर्वी मुंबईला रेड झोनमधून ग्रीन झोनमध्ये आणण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली असून महाराष्ट्रातील ३७,१३६ रुग्णांचा विचार करता मुंबईत २२,७४६ रुग्णसंख्या ही खूप जास्त असून मे अखेरपर्यंत ही संख्या दुपटीहून जास्त होण्याची शक्यता लक्षात घेऊन करोनाची लागण झालेल्या रुग्णांसाठी वेगाने उपचार व्यवस्था वाढविण्यात येत आहे. यात खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा या आयसीयू खाटांसह ताब्यात आल्यानंतर पालिकेचा ताण थोडा कमी होईल, असेही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.