मृत्युदरात मात्र वाढ

मुंबई: राज्यात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत रुग्णसंख्येत ३३ टक्क्यांनी घट झाली आहे. मृतांची संख्या कमी झाली असली तरी मृत्युदर मात्र साडेचार टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर गेला आहे.

मुंबई, पुण्यासह आता राज्याच्या इतर जिल्ह्यातील रुग्णसंख्याही कमी होत आहे. २२ ते २८ मे या आठवड्यात राज्यात १,३९,६९५ रुग्णांचे नव्याने निदान झाले होते आणि ५,८९८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. २९ मे ते ४ जून या आठवड्यात रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असून नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या ९२,३५० पर्यंत घसरली. मृतांची संख्याही या आठवड्यात कमी झाली असून ४,७४१ मृत्यू झाले आहेत. परंतु नव्याने बाधित झालेल्या रुग्ण आणि मृतांची संख्या यांची तुलना केली असता गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात मृत्युदर चारवरून पाच टक्क्यांवर गेला आहे. राज्याचा एकूण मृत्युदरही १.९४ टक्क्यांवरून १.६९ टक्क्यांवर गेला आहे.

बहुतांश जिल्ह्यांमध्ये घट

राज्यात बहुतांश जिल्ह्यांमधील रुग्णसंख्येत गेल्या आठवड्याच्या तुलनेत घट झाली आहे. रुग्णसंख्येत सर्वाधिक घट बुलढाणा, अहमदनगर आणि सातारा जिल्ह्यात झाली असून या ठिकाणी गेल्या आठवड्याच्या तुलनेत सुमारे चार हजाराहून अधिक रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्या खालोखाल पुणे, सोलापूर, सांगली, बीड, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये या आठवड्यात दोन हजारांहून अधिक नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

सिंधुदुर्गात मात्र रुग्णवाढ

राज्यात केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठवड्याच्या तुलनेत सुमारे ७०० नव्या बाधितांची संख्या वाढली आहे. मेच्या शेवटच्या आठवड्यात सिंधुदुर्गमध्ये २९३७ रुग्ण नव्याने आढळले होते, तर  जूनच्या पहिल्या आठवड्यात रुग्णसंख्येत ३६३१ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. मृतांच्या संख्येत मात्र त्यातुलनेत घट नोंदली आहे.

औरंगाबाद, नागपूर, नांदेडमध्ये आठवड्याच्या मृत्युदरात वाढ

बहुतांश जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात मृतांची संख्याही कमी झाली असून यात प्रामुख्याने पुणे, सोलापूर, वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे. परंतु नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्याच्या तुलनेत मात्र मृतांची संख्या वाढल्यामुळे काही जिल्ह्याच्या मृत्युदरात मात्र या आठवड्यात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये गेल्या आठवड्यात नव्याने बाधित झालेले रुग्ण आणि मृत्यू याची तुलना करता १९ टक्के मृत्युदर असून राज्यात सर्वाधिक होता. या आठवड्यात हे प्रमाण ४८ टक्क्यांवर गेले आहे. नांदेडमध्ये आठवड्याचा मृत्युदर १५ टक्क्यांवरून ४३ टक्क्यांवर, तर नागपूर ग्रामीणमध्ये तीन टक्क्यांवरून २७ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्या खालोखाल नंदुरबार, परभणी, लातूर, भंडारा आणि गडचिरोली येथे मृत्युदरांत वाढ झाली आहे.

मुंबई महानगरप्रदेशात रुग्णसंख्येत घट

मुंबई महानगर प्रदेशात गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून मुंबईत सुमारे दीड हजारांनी नव्या बाधितांची संख्या कमी झाली आहे. मृत्युदरांतही बहुतांश भागात घट झाली आहे. परंतु वसई-विरार, पालघर, भिवंडी निजामपूर भागांत मात्र मृत्युदरात मोठी झाल्याचे दिसून येते. वसई विरारमध्ये गेल्या आठवड्यात १२५६ रुग्णांचे निदान झाले असून ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर या आठवड्याने नव्याने होणाऱ्या बाधितांची संख्या १०३१ आणि मृतांची संख्या १५९ वर गेली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत भिवंडी निजामपूरचा मृत्युदर ६ टक्क्यांवरून २१ टक्क्यावर तर पालघरचा २ टक्क्यावरून ५ टक्क्यावर गेला आहे.