करोना निर्बंधांमुळे व्यवसायाला फटका; रेल्वे प्रवासाला परवानगी नसल्याने मालाच्या वाहतुकीतही अडथळे

मकरसंक्रांतीचे खास आकर्षण म्हणजे आकाशात होणारी पतंगबाजी. मात्र, यंदा करोना निर्बंधांमुळे पतंगक्रीडेबाबत उदासीन वातावरण आहे. त्यातच लोकलसेवा बंद असल्याने घाऊक पतंगविक्रेत्यांना पतंगीच्या मालाची ने-आण करण्यासाठी रस्ते वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. हा खर्च परवडत नसल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा पतंगविक्रीला ६० टक्क्यांचा फटका बसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

मुंबईच नव्हे तर देशभरात संक्रांतीच्या निमित्ताने पतंगोत्सव साजरा केला जातो. जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या काळात पतंगाला मोठी मागणी असते, परंतु यंदा मुंबईतील वांद्रे, मोहम्मद अली मार्ग, धारावी इथल्या घाऊक पतंग व्यावसायिकांवर ग्राहकांची वाट पाहण्याची वेळ आली आहे. प्रवासात येणाऱ्या अडचणींमुळे मुंबईबाहेरून येणारे छोटे दुकानदार खरेदीसाठी फिरकत नसल्याची खंत इथल्या व्यापाऱ्यांनी मांडली. ‘संक्रांत आठ दिवसांवर आली तरी ४० टक्केही व्यवसाय होऊ शकला नाही. दरवर्षी या काळात आम्हाला जेवायलाही वेळ नसतो, पण यंदा आमचे डोळे फक्त ग्राहकांच्या वाटेकडे आहेत,’ असे वांद्रे येथील महाराष्ट्र काइटचे सलमान शेख यांनी सांगितले.

बहुतांशी विक्रेते बरेली आणि उत्तर प्रदेशातून पतंगांची आयात करतात. शेख यांच्या ‘महाराष्ट्र काइट’ या कारखान्यात वर्षभर पतंग बनवण्याचे काम सुरू असते. साधारण तीन ते चार लाख पतंग वर्षभरात तयार केले जातात. संक्रांतीच्या काळात एक लाखांहून अधिक पतंगाची ते विक्री करतात, यंदा मात्र प्रतिसाद कमी असल्याचे त्यांनी सांगितले. वांद्रे ते डहाणूपर्यंतचे ग्राहक वांद्रे येथे, दादर ते कल्याणपर्यंतचे ग्राहक धारावीत तर दक्षिण मुंबईतला ग्राहकवर्ग मोहम्मद अली मार्ग येथे पतंग खरेदीसाठी जातो. यावर्षी लोकल सेवा बंद असल्याने घाऊक माल खरेदी करणारे छोटे दुकानदार येण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

‘करोनामुळे सहा महिने बाजारपेठ बंद होती. जनजीवन पूर्ववत होत आहे याचा अंदाज घेऊन बरेलीहून दरवर्षी इतकाच माल मागवला, परंतु त्यातील ७५ टक्के माल पडून राहिला आहे. पतंग नाजूक असल्याने आता वर्षभर या मालाची काळजी घ्यावी लागेल,’ अशी माहिती स्टँडर्ड काइटच्या झमीर शेख यांनी दिली.

लोकलमुळे नुकसान

‘पतंगांचा व्यापार किरकोळ आहे, हंगामी असल्याने होणारा नफाही किरकोळच असतो. आठशे हजार रुपयांमध्ये शेकडो पतंग येतात, पण ते नेण्यासाठी लोकल सेवा उपलब्ध नसल्याने खासगी वाहन करावे लागत आहे. त्यामुळे हजार रुपयांचे पतंग आणि प्रवासाला दोन हजार अशी परिस्थिती आहे. परिणामी, लांबून येणाऱ्यांनी पाठ फिरवली,’ अशी माहिती बाजारपेठेतील व्यावसायिकांनी दिली.

पतंगांच्या किमती

३ रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंतचे पतंग बाजारात उपलब्ध आहेत. ३ ते १० रुपयांमध्ये कागदी पतंग, तर त्यावरच्या दरात प्लास्टिक आणि विविध छापील चित्र असलेल्या पतंगांचा समावेश आहे. लहान मुलांसाठी कार्टून आणि आकर्षक रंगांचे पतंगही उपलब्ध आहे. तर मांजाच्या किमती २० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत आहेत. घाऊक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ‘कोडी’ या परिमाणावर पतंग दिले जातात. एक कोडीत २० पतंग असतात.