मुंबई : महाराष्ट्रातील आणि विशेषत: मुंबईतील करोना परिस्थिती चिंताजनक आहे. देशातील ४६ टक्के करोना मृत्यू महाराष्ट्रात आहेत आणि आकडय़ांची लपवाछपवी सुरूच आहे, असे  विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस म्हणाले, राज्यातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत परिस्थिती बिघडली आहे. करोना चाचण्यांपैकी २०-२५ टक्के सकारात्मक येत असल्या तरीही करोना चाचण्यांची संख्या कमी करण्यात येत आहे. सध्या दररोज पाच-साडेपाच हजारच चाचण्या होत आहेत. चाचण्यांची संख्या वाढविली नाही, तर करोना प्रसार रोखता येणार नाही.

त्याचबरोबर आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अजूनही करोना मृत्यूंची नोंद केली जात नाही. करोनामुळे घरी मृत्यू झालेल्या सुमारे ६०० हून अधिक मृत्यूंची नोंद करोना मृत्यू म्हणून झालेली नाही. ते मृत्यू अन्य कारणांमुळे असल्याची नोंद केली जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

‘मंत्री झाल्याने शहाणपण येत नाही’

देवेंद्र फडणवीस  राज्यभर दौरे करीत आहेत. त्यावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. त्याविषयी विचारता फडणवीस म्हणाले, आदित्य ठाकरे अजून लहान, तरुण आहेत. मी त्याकडे फार लक्ष देणार नाही. कोणाला मंत्रिपद द्यायचे, हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मंत्री झाल्याने शहाणपण येते, असे नाही.