News Flash

करोना चाचणीचे दर आणखी कमी होणार!

आरटीपीसीआर १५०० रुपये तर अॅन्टिबॉडी चाचणी २५० रुपये

संदीप आचार्य 

मुंबई: करोनाला अटकाव करण्यासाठी माफक दरात व कमीतकमी वेळेत चाचणी होण्याची गरज लक्षात घेण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. या भूमिकेनुसार आरोग्य विभागाने तातडीने याचा आढावा घेतला असून ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा दर १५०० रुपये तर आयजीजी अॅण्टीबॉडी चाचणीचा दर २५० रुपयांपर्यंत निश्चित करता येऊ शकतो असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. याबाबतचा अंतिम अहवाल येत्या काही दिवसात सादर केला जाणार आहे.

यापूर्वी करोना चाचणीसाठी महाराष्ट्रात ४५०० रुपये प्रतिचाचणी मोजावे लागत होते. हे दर कमी करण्याबाबत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जूनमध्ये एका समितीची स्थापना केली होती. या समितीने त्यावेळी करोना चाचणी करणार्या सर्व खासगी प्रयोगशाळांच्या मालकांबरोबर सखोल चर्चा करून ‘आरटीपीसीआर’ करोना चाचणीचे दर ४५०० हजार रुपयांवरून २२०० रुपयांपर्यंत कमी करण्यात आले होते. याबाबत डॉ. सुधाकर शिंदे यांनी सादर केलेल्या अहवालात हा चाचणी दर आणखीही कमी होऊ शकतो असे नमूद करण्यात आले होते. यासाठी केंद्र सरकारने या चाचणीसाठी लागणार्या रिएजंटस् वरील जीएसटी व आयात कर माफ केल्यास हे दर निश्चित कमी होतील असे स्पष्ट केले होते.

दरम्यानच्या काळात ‘आयसीएमआर’ने अॅण्टीबॉडी चाचणीलाही मान्यता दिली असून या चाचणीसाठी सध्या ५५० ते ६०० रुपये खर्च येतो. करोनाला वेगाने अटकाव घालायचा असल्यास जास्तीतजास्त चाचण्या झाल्या पाहिजे असे ‘आयसीएमआर’ तसेच अनेक ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. जास्त चाचण्या व कमीतकमी वेळात चाचणीचा निकाल आल्यास करोना रुग्णांवर वेळेत व प्रभावी उपचार करणे शक्य होणार आहे. जास्त चाचण्या केल्यास करोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढेल मात्र उपचार व करोना रोखण्यासाठी त्याचीच गरज असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. यातूनच करोना चाचणीचे दर कमी करण्यासंदर्भात डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली यापूर्वी समिती नेमण्यात आली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी टास्क फोर्सचे डॉक्टर तसेच मुख्य सचिव व आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांसह आयुक्त व वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी जास्तीतजास्त चाचण्या केल्या पाहिजेत असा मुद्दा मांडला तर खाजगी प्रयोगशाळांचे चाचण्यांचे दर आणखी कमी करता येतील का, ते तपासण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. प्रामुख्याने मुंबईत दररोज किमान ३० हजार करोना चाचण्या झाल्या पाहिजेत असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पुण्यामध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले असून जवळपास दहा हजार चाचण्या केल्या जात असून मुंबईतही येत्या काही दिवसात दहा हजार चाचण्या केल्या जातील असे पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितले. राज्यात आज शंभरच्या आसपास करोना चाचणी प्रयोगशाळा असून यात जवळपास निम्म्या प्रयोगशाळा खासगी आहेत.

राज्य शासनाच्या पातळीवर गेल्या महिन्यात चाचणीचे दर ४५०० रुपयांवरून २२०० रुपये करण्यात आले असून हे दर आणखी कमी करावयाचे असल्यास केंद्रसरकारने ‘आरटीपीसीआर’ चाचणीसाठी लागणारे रिएजंटस् व अन्य बाबींवरील जीएसटी व इतर शुल्क माफ केले पाहिजे. तसे केल्यास या चाचणीचा दर सध्याच्या २२०० रुपयांवरून १५०० रुपये होऊ शकतो असे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच आयजीजी अॅण्टीबॉडी चाचणीचा सध्याचा साडेपाचशे रुपयांचा दरही २५० रुपयांपर्यंत होऊ शकतो असे या अधिकाऱ्याने सांगितले. तामिळनाडू राज्यातही अशाच प्रकारे करोना चाचणीचे दर कमी करण्यात आले असून त्याचा अभ्यास करून लवकरच आरोग्य विभाग आपला अहवाल सादर करणार आहे. या अहवालानुसार राज्य शासनाकडून चाचणीसाठी लागणार्या सामग्री वरील जीएसटी व अन्य कर मागे घेण्याबाबत केंद्र सरकारला विनंती केली जाईल. केंद्र शासनाने ही विनंती मान्य केल्यास अथवा हा भार राज्य शासनाने उचलण्यास करोना चाचण्यांचे दर निश्चित कमी होतील, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 7:44 pm

Web Title: corona test rate will decreased in some days says cm uddhav thackeray scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘कोकिलाबेन’ रुग्णालयात मुंबईतील पहिलं हृदयप्रत्यारोपण यशस्वी
2 Corona: पत्नीला घेऊन पतीची धावाधाव, १२ तासात चार रुग्णालयांनी नाकारलं; अखेर सायन रुग्णालयात मृत्यू
3 Video : मलबार हिलवरचे मिनी धोबीघाट
Just Now!
X