संदीप आचार्य

गर्भवती, वयोवृद्ध तसेच करोनाची लक्षणे असलेल्या लोकांची चाचणी व निकाल यापुढे अर्ध्या तासात होणार असून यामुळे रुग्ण शोधण्यात व उपचारात गतिमानता येणार आहे. राज्य शासनाने जलद चाचणीस मान्यता दिल्यानंतर मुंबई महापालिकेने ‘मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग’ हाती घेतले असून या अंतर्गत मुंबईत एक लाख चाचण्या करण्यात येणार आहेत.

‘भारतीय वैद्यक संशोधन परिषद’ ‘आयसीएमआर’ने मान्यता दिलेल्या ‘एस.डी.बायोसेन्सर’ या कंपनीकडून एक लाख किट खरेदी करण्यात येणार आहेत. या जलद चाचण्यांसंदर्भात मुख्य सचिव अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहेल आदी प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक झाली.

यानंतर शासनाने जलद चाचण्या करण्याचा निर्णय घेतला असून चहेल यांनी मंगळवारी पालिकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मुंबईतील करोना आटोक्यात आणण्यासाठी एक लाख चाचण्या करण्याचे जाहीर केले. याअंतर्गत प्रत्येक वॉर्डातील करोना अलगीकरण केंद्रातील करोना रुग्णांच्या संपर्कातील रुग्णांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव असलेल्याविभागात जाऊन पालिकेचे कर्मचारी तपासणी करून चाचण्या करतील. सध्या मुंबईत दररोज साडेचार हजार चाचण्या होत असून आम्ही दररोज दोन हजार जास्तीच्या चाचण्या करणार आहोत असे आयुक्त चहेल म्हणाले.

रुग्णसंख्या हजारच्या आत

७५ दिवसांत प्रथमच मुंबईत करोना रुग्णांची संख्या ८४२ एवढी कमी झाली आहे. साधारणपणे मुंबईत दररोज १२०० ते १५०० रुग्ण आढळत असताना रुग्णांची कमी संख्या आढळणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. याचा अर्थ प्रति वॉर्ड ३५ केसेस असा होत असून करोना नियंत्रणासाठी सर्व शक्ती पणाला लावू असे आयुक्त चहेल यांनी सांगितले.

* ७० वर्षांवरील लोकांना चाचणीसाठी डॉक्टरच्या पत्राची गरज नाही. तसेच यापूर्वी रुग्णांना प्रत्यक्ष तपासणे डॉक्टरांना बंधनकारक होते आता डॉक्टर रुग्णाला करोना चाचणी करण्यासाठी ‘ई प्रिस्क्रिप्शन’ देऊ शकतात, असा महत्त्वपूर्ण निर्णय  घेतला आहे.

* ‘एस. डी. बायोसेन्सर’ कंपनीबरोबर चर्चा करून एका चाचणीचा खर्च ४५० रुपये निश्चित करण्यात आला आहे. याशिवाय अबॉट व रॉश कंपन्यांच्या रॅपिड टेस्टिंग किटनाही मान्यता देण्यात आली आहे.