मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबई :  राज्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढणे ही चिंतेची बाब आहे. आगामी काळात करोनाचे आव्हान यशस्वीपणे पेलण्यासाठी  प्रत्येक जिल्ह्यच्या ठिकाणी कोरोनाची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा उभारल्या जातील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

हा लढा सकारात्मकरीत्या लढावा लागेल. जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कोविड —१९ आरटीपीटीसीआर प्रयोगशाळेचे ऑनलाइन उद्घाटन  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा जालना जिल्ह्यचे पालकमंत्री राजेश टोपे  उपस्थित होते.

मार्च महिन्यात आपल्या राज्यात करोनाची चाचणी करणाऱ्या केवळ दोनच प्रयोगशाळा होत्या. आज त्यांची संख्या ११० वर पोहचली आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्हा मुख्यालयात अशी प्रयोगशाळा उभारण्यात येईल. करोना बाधितांवर उपचारासाठी काही ठिकाणी आरोग्य सुविधांची तात्पुरत्या स्वरूपात उभारणी करण्यात आली असून येणाऱ्या काळात या सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्याची सूचनाही प्रशासनाला के ल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या बी.एस.एल.—३ या आधुनिक पध्दतीच्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर करोना चाचण्या करून रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.