• परराज्यातून मालवाहतूक करणारी वाहने
  • धान्य आणि अत्यावश्यक सेवेतील उत्पादनांना विलंबाची भीती

 

मुंबई : परराज्यातून येणाऱ्या मालवाहतूक वाहनांच्या चालक आणि कर्मचाऱ्यांना करोनाची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केल्याचा फटका मालाच्या पुरवठा साखळीला बसण्याची शक्यता आहे.

आठ ते दहा दिवस विविध राज्यांच्या सीमा ओलांडणाऱ्या मालवाहतूक वाहनांच्या चालकांना महाराष्ट्रात येण्यापूर्वी चाचणी करून त्याचा अहवाल येईपर्यंत थांबावे लागणार आहे. त्यामुळे धान्यासारख्या मालाबरोबरच अत्यावश्यक सेवेतील उत्पादने राज्यात पोहोचण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने करोना नियंत्रणात आणण्यासाठी घातलेले निर्बंध ३१ मेपर्यंत वाढवले आहेत. तसेच नवीन निर्बंधही लागू केले असून परराज्यातून येणाऱ्या मालवाहतूक वाहनांच्या चालक व सहाय्यकांनी करोना चाचणी अहवाल देणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा अहवाल ४८ तासांपूर्वीचा नसावा, अशी अटही घालण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूकदारांना मालाची गाडी भरल्यानंतर महाराष्ट्राच्या सीमेजवळील गावांमध्ये आरटीपीसीआर चाचणी केंद्र शोधत फिरावे लागणार आहे. अनेक राज्यांत आरटीपीसीआर चाचणी अहवाल मिळण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे मालवाहतूकदारांना चाचणी अहवाल येईपर्यंत दोन दिवस मालाची गाडी रस्त्याकडेला उभी करण्याशिवाय गत्यंतर राहाणार नाही. यामुळे औषधे, आरोग्य क्षेत्रातील उत्पादने, अन्नधान्य, कारखान्यांसाठीचा कच्चा माल, आयात-निर्यात मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा प्रवास रखडण्याची शक्यता आहे. त्यातून हा माल इच्छित स्थळी पोहोण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा विलंब होऊ शकेल, असे मत मालवाहतूकदारांनी व्यक्त केले. अनेक वाहने प्राणवायूचे सिलिंडर वाहून नेतात, प्राणवायूचे टँकर्स राज्यांच्या सीमा ओलांडतात. या वाहनांनाही विलंब झाल्यास अडचणी उद्धभवण्याची शक्यता वाहतूकदारांनी व्यक्त केली जात आहे. ऑनलाइन खरेदी केलेल्या वस्तूही ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.

…तर दोन दिवसांची प्रतीक्षा

नैतिक कटीरा हे अंकलेश्वर आणि बडोदा येथून निर्यातीसाठी औषधे वाहून नेतात. त्यांना कंपनीतून माल भरल्यानंतर त्याच दिवशी तो विमानतळावर पोहोच करावा लागतो. आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक केल्यास हा अहवाल येईपर्यंत दोन दिवस वाट पाहावी लागेल. त्यातून विमानतळावरील मालाची खेप पोहोच करण्यास विलंब होणार आहे. यातून कार्गो सव्र्हिसेसच्या साखळीतही खंड पडणार आहे, असे कटीरा यांनी सांगितले.

प्रवास कालावधीमुळे अहवाल अवैध 

दिल्ली, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू आदी राज्यांतून मालवाहतूक करणारी वाहने राज्यात येण्यासाठी ४८ तासांहून अधिक कालावधी लागतो. या परिस्थितीत जर चालकांनी माल भरून निघताना आरटीपीसीआर चाचणी केली, तर राज्यात दाखल होईपर्यंत त्यांच्या चाचणी अहवालाने ४८ तासांची मर्यादा ओलांडली असेल. त्यामुळे तो अहवाल वैध राहाणार नाही.