मुंबईतील खासगी कार्यालयांना ५० टक्के उपस्थितीची अट
मुंबई : सर्वसामान्य प्रवाशांसाठी दहा महिन्यांनी १ फेब्रुवारीपासून उपनगरीय रेल्वे (लोकल) सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मोठी करोना उपचार केंद्रे ३१ मार्चपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच खासगी कार्यालयांना ५० टक्के उपस्थितीची अटही घालण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात मुंबईत करोनाचा शिरकाव झाल्यानंतर मार्चअखेरीस मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा बंद करण्यात आली. टाळेबंदी शिथिल केल्यानंतर अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यानंतर महिलांसाठी लोकलसेवा सुरू करण्यात आली होती. मात्र सर्वसामान्यांना, खासगी क्षेत्रातील पुरुषवर्गाला अद्यापही लोकलने प्रवासाची मुभा नव्हती. सोमवारपासून सर्वसामान्यांनाही ठरावीक वेळेत लोकलने प्रवास करता येणार आहे. त्यामुळे सोमवारपासून प्रवाशांची संख्या व गर्दी वाढू लागणार आहे.
गेल्या दहा महिन्यांत पालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबईत करोना आटोक्यात आणण्यात यश आले आहे. परंतु सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू झाल्यावर रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुंबईतील सहा मोठी करोना उपचार केंद्रे ३१ मार्चपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. यामध्ये दहिसर, गोरेगाव नेस्को, बीकेसी, वरळी एनएससीआय, मुलुंड, भायखळा येथील रिर्चड सन्स अँड कंपनीतील केंद्र अशी सहा करोना उपचार केंद्रे ३१ मार्चपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
निर्देश काय?
सर्वसामान्यांसाठी उपनगरीय रेल्वे सुरू केल्यामुळे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढण्याचीही शक्यता आहे. मात्र या कार्यालयांना व खासगी आस्थापनांना एकावेळी ५० टक्के उपस्थिती राहील, याच पद्धतीने नियोजन करण्याबाबत निर्देश देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 31, 2021 12:38 am