दिवाळीनंतर मुंबईतील करोनाचा संसर्ग कमी होत चालला असून रुग्णवाढीचा दर जेमतेम ०.२१ टक्क्यापर्यंत खाली आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधीही ३६६ दिवसांवर गेल्याने मुंबईतील स्थिती सध्यातरी नियंत्रणात आहे. मात्र, ब्रिटनमध्ये करोनाचा नवीन विषाणू आढळल्यापासून मुंबईत विशेष खबरदारी घेण्यात येत असून चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. या नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर आणखी एक आठवडा मुंबईकरांना विशेष काळजी घ्यावी लागेल, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

दिवाळीनंतर किं चित वाढलेली रुग्णसंख्या डिसेंबरपासून पुन्हा एकदा आटोक्यात येऊ लागली आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून ३६६ दिवसांवर गेला. तर रुग्णवाढीचा दरही ०.२१ टक्क्यापर्यंत खाली आला आहे. मुंबईतील परिस्थिती सुधारत असतानाच ब्रिटनमध्ये करोनाचा नवा विषाणू आढळल्यामुळे जगभरात पुन्हा खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतही विशेष काळजी घेतली जात आहे. त्यामुळे ५ जानेवारीपर्यंत मुंबईत व राज्यातही रात्रीच्या वेळी संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. तर भारत आणि ब्रिटनमधील विमानसेवाही २३ डिसेंबरपासून बंद करण्यात आली आहे. २१ व २२ डिसेंबर रोजी जेवढे प्रवासी ब्रिटनमधून आले त्यांना हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवले जात आहे. मात्र त्याआधी मुंबईत आलेल्या प्रवाशांमुळे संसर्गाचा धोका असल्यामुळे पालिके ची यंत्रणा सावध आहे. २१ डिसेंबरपूर्वी आलेल्या प्रवाशांशी विभाग कार्यालयांतील नियंत्रण कक्षाद्वारे संपर्क साधला जात आहे.

दुसरीकडे मुंबईतील चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. रोज १५ ते १८ हजार चाचण्यांचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र या आठवडय़ात दरदिवशी २२ ते २५ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. तसे असले तरी सध्यातरी के वळ पाच टक्के  लोकांचे अहवाल बाधित येत आहेत. त्यामुळे दर दिवशी सहाशे ते सातशे बाधित रुग्ण आढळत आहेत. मुंबईतील स्थिती आटोक्यात असली तरी लोकांनी सावधगिरी बाळगलीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

गंभीर प्रकृतीचे ४४५ रुग्ण

मुंबईती एकूण उपचाराधीन रुग्णांपैकी अंदाजे ४७००  रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. तर अडीच हजार रुग्णांना लक्षणे आहेत. केवळ ४४५ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. वेळीच चाचण्या केल्यामुळे रुग्ण वेळेवर आढळून येत आहेत, त्यामुळे गंभीर रुग्णांची संख्या कमी झाली असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

१५ डिसेंबरपूर्वी जे प्रवासी ब्रिटनमधून आले आहेत. त्यांच्यापैकी कोणी बाधित असते आणि त्यांच्याकडून संसर्ग झाला असता तर त्याचे परिणाम आतापर्यंत दिसले असते. मात्र १५ ते २१ डिसेंबपर्यंत जे प्रवासी आले त्यांच्यापैकी कोणी बाधित असेल आणि त्यांच्याकडून प्रसार झाला असेल तर ते येत्या आठ दिवसांत समजू शकेल. त्यामुळे पुढील एक आठवडा म्हणजेच ५ जानेवारीपर्यंतचा काळ हा महत्त्वाचा आहे.

– सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त