News Flash

राज्यात १८ ते ४४ वयोगटाच्या टप्प्यातही वयानुसार गट पडणार? आरोग्यमंत्र्यांनी दिले संकेत!

१८ ते ४४ वयोगटासाठीच्या लसीकरणाबाबत महाराष्ट्रात नियमावली बदलणार!

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रासह देशभरात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. त्यानुसार लसींच्या उपलब्धतेनुसार काही राज्यांनी हे लसीकरण सुरू केलं. महाराष्ट्रात देखील त्याची मोजक्या केंद्रांवर सुरुवात करण्यात आली. मात्र, लसींचा तुटवडा आणि त्यातून केंद्रांवर होणारा गोंधळ लक्षात घेता आता राज्य सरकार १८ ते ४४ या वयोगटासाठीच्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये देखील वेगवेगळे स्लॉट करून त्यानुसार लसीकरण करण्याची शक्यता आहे. हे स्लॉट वयोगट किंवा सहव्याधी यानुसार असू शकतात, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. शुक्रवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शहरी नागरिक लसीकरणासाठी ग्रामीण भागात!

लसींचा साठा अपुरा असल्यामुळे केंद्रांवर लसींचा पुरवठा कमी प्रमाणात केला जात आहे. या पार्श्वभूमीवर १८ ते ४४ वयोगटासाठी राज्य सरकारने मोजक्या केंद्रांवरच लसीकरण सुरू केलं आहे. त्यामुळे अशा केंद्रांवर या वयोगटातल्या नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. मात्र, त्याविषयी काही समस्या येत असल्याचं राजेश टोपे म्हणाले. “१८ ते ४४ वयोगटासाठी ग्रामीण भागातल्या केंद्रांवर त्याच भागातले लोकं न जाता मेट्रो शहरांमधून ज्यांना तंत्रज्ञानाची जाण आहे अशा लोकांनी कोविन अॅपवर नोंदणी करून केंद्रांवर जाऊन लसीकरण करून घेतलं. त्यामुळे स्थानिक भागात अस्वस्थता निर्माण झाली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी मी बोललो. ही समस्या सोडवण्यासाठी लस मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आपल्याला स्लॉट द्यावे लागणार आहेत. मग वयोगटाचा किंवा कोमॉर्बिडिटीचा स्लॉट देता येईल. म्हणून ३५ ते ४४ या वयोगटातल्या लोकांना प्राधान्य देता येईल का? त्यातही सहव्याधी असलेल्यांना अधिक प्राधान्य देता येऊ शकेल. त्याबाबत दीड वाजता मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार आहे”, असं टोपे म्हणाले.

स्पुटनिकसाठी चर्चा सुरू!

दरम्यान, राज्यात लसीचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी रशियाची स्पुटनिक लस मागवण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राजेश टोपेंनी यावेळी दिली. “रशियाची स्पुटनिक व्ही ही लस महाराष्ट्रात मागवण्यासाठी चर्चा सुरू आहे. त्यांच्याशी लसीच्या दरांबाबत बोलणी सुरू आहेत”, असं ते म्हणाले.

भारतात करोनाचा उद्रेक! सलग तिसऱ्या दिवशी चार लाखांहून अधिक रुग्ण; ३९१५ मृत्यूंची नोंद

ऑक्सिजनसाठी ३८ पीएसए प्लांट!

ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी राज्यात ३८ पीएसए प्लांट लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, लसीकरणाविषयीही ताजी आकडेवारी दिली. “राज्याने १ कोटी ७३ लाख २१ हजार ०२९ लोकांना लसीकरण केलं आहे. १८ ते ४४ या वयोगटासाठी राज्यानं २ लाख १५ हजार २७४ लोकांना लसीकरण केलं आहे. २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आल आहेत. ही देशात सर्वाधिक संख्या आहे. हवेतून ऑक्सिजन निर्मितीसाठी आपण ३८ पीएसए प्लांट कार्यान्वित केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्लांटच्या १५० हून जास्त ऑर्डर्स दिल्या आहेत. यातून ९५ ते ९८ टक्के शुद्धतेचा ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकतो. यामुळे लिक्विड ऑक्सिजनची मागणी कमी होऊ शकते. यातून ५३ मेट्रिक टन ऑक्सिजन मिळू शकतो”, असं ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2021 1:14 pm

Web Title: corona vaccination in maharashtra health minister on 18 to 44 age group pmw 88
टॅग : Corona
Next Stories
1 ‘भाजपाने मनोरा आमदार निवास खर्चाबाबत आम्हाला उपदेश देऊ नये’; सचिन सावंत यांचा टोला
2 “आमच्यावर हसवण्याचंच ठरवलं असेल तर आम्ही देशाला मुंबई मॉडेल कसं समजवून सांगणार?”
3 सुनियोजनामुळे प्राणवायूच्या समस्येवर मात
Just Now!
X