News Flash

राज्यात पाच लाखांहून अधिक जणांचे करोना लसीकरण

राज्यात दररोज साधारणपणे ४० ते ४५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जात आहे.

प्रतिकात्मक

राज्यात प्राधान्यक्रम ठरलेल्या व्यक्तींना करोना लसीकरण सुरू असून ६५२ केंद्रांच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविली जात आहे. आतापर्यंत एकूण पाच लाखांहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर काम करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण केले जाणार असून त्याची नोंदणी एक मार्चपासून सुरू होईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले, राज्यात केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे लसीकरण सुरू आहे. प्रत्येक आठवडय़ाला लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात दररोज साधारणपणे ४० ते ४५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत को-विन पोर्टलवर १० लाख ५४ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून त्यापैकी चार लाख ८१ हजार ६०७ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. पाच लाख ४७ हजार अन्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून त्यापैकी ५४ हजार ५९० जणांना लस देण्यात आली आहे.

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील व ज्यांना सहव्याधी आहे अशा ५० वर्षांखालील व्यक्तींचे लसीकरण केले जाणार असून त्यासंदर्भात केंद्र शासनकडून सूचना मिळालेल्या नाहीत. साधारणपणे एक मार्चच्या सुमारास त्यांची नोंदणी सुरू होण्याची शक्यता असून त्यानंतर लसीकरण केले जाईल, असेही टोपे यांनी सांगितले.

मुंबईत उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट

मुंबईत मंगळवारी ३७५ नव्या रुग्णांची नोंद झाली असून तीन रुग्णांचा मृत्यू झाला. तर मंगळवारी ४१५ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या ५२९२ झाली आहे.

मुंबईत दरदिवशी आढळणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. मुंबईतील करोना संसर्गावर नियंत्रण येत असून मंगळवापर्यंत एकूण बधितांची संख्या ३ लाख १२ हजार ६४८ झाली आहे. आतापर्यंत दोन लाख ९५ हजाराहून अधिक म्हणजेच ९४ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

मुंबईतील रुग्ण वाढीचा सरासरी दर ०.१२ टक्कय़ांवर स्थिर आहे. रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी तब्बल ५६० दिवसांपर्यंत म्हणजे दीड वर्षांहून अधिक आहे. मंगळवारी तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. एकूण ११ हजार ३९६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत २९ लाख ३३ हजाराहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 12:27 am

Web Title: corona vaccination of more than five lakh people in the state abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘लहान मुलांना चांगला-वाईट स्पर्श कळतो’
2 बैठकीतील सहभाग कर्तव्याचा भाग असल्याचा पुरावा काय?
3 माघी गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर
Just Now!
X