करोनाविषयक राज्य कृती दलातील तज्ज्ञांचे मत

संदीप आचार्य, लोकसत्ता

मुंबई : मुंबईसह राज्यभरात करोनाच्या रुग्णांत पुन्हा वेगाने वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करतानाच अधिकाधिक चाचण्या, व्यापक रुग्णसंपर्क शोधमोहीम यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे मत करोनाविषयक राज्य कृती दलातील तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे मोठय़ा प्रमाणावर नागरिकांचे लसीकरण करणे आवश्यक असून त्याकरिता लसीकरणाचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक असल्याचेही या डॉक्टरांनी सांगितले.

राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी करोनाच्या पुन्हा वाढीला नागरिक आणि राजकीय मंडळी यांचा बेजबाबदारपणा जबाबदार असल्याचे मत व्यक्त केले. ‘ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी प्रचंड धुरळा उडवला. त्यासाठी राजकीय पक्षांनी जागोजागी मेळावे घेतले. निवडणूक निकालानंतर तर जल्लोष सुरू होता. या सर्वात कुठेही सुरक्षित अंतर वा मास्क वापरण्याचे पालन झाले नव्हते. याशिवाय लग्नसमारंभ तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमात सरकारने लागू केलेल्या कोणत्याही नियमांचे पालन होताना दिसत नाही. मुंबईत लोकल प्रवास सर्वासाठी सुरू झाला आहे. मंदिरापासून हॉटेल व बार रेस्टॉरंट्स जोरात सुरू आहेत. यातूनच पुन्हा करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत,’ असे ते म्हणाले. एका रुग्णामागे संपर्कातील २० लोकांना शोधण्याचे आदेश सरकारने जारी केले. त्याचेही कुठे पालन होताना दिसत नाही. आम्ही राज्य कृती दल म्हणून या सर्व बाबी सरकारच्या निदर्शनास आणल्या आहेत. यावर कठोर कारवाई केली नाही तर करोनाची दुसरी लाट आल्याशिवाय राहाणार नाही, असेही डॉ. ओक म्हणाले.

राज्य कृती दलातील सदस्य आणि विख्यात मधुमेहतज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी पुरेशा चाचण्या आणि रुग्णसंपर्कातील लोक शोधण्यातील ढिलाई नव्या करोनावाढीला जबाबदार असल्याचे मत मांडले. ‘लोकांनी मुखपट्टीचा वापर करावा, तसेच लग्न समारंभ आदी कार्यक्रम आणि सुरक्षित अंतराचे पालन करण्याचे आदेश केवळ कागदावरच राहिले. महापालिका व पोलिसांनी त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली असती तर मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात राहिली असती,’ असे डॉ. शशांक जोशी म्हणाले. महापालिकेने मुंबईत पुन्हा एकदा सिरो सव्‍‌र्हे करणे गरजेचे असून रुग्ण संपर्कातील लोकांचा मोठय़ा प्रमाणात शोध घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.

लोकच जर काळजी घेणार नसतील तर तो करोना तरी काय करेल, असा उपरोधिक सवाल मुंबई महापालिकेच्या शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी उपस्थित केला. करोना कोणालाच बघत नाही आणि सोडतही नाही हे राजकारणी लोकांनीही लक्षात घेतले पाहिजे. समाजाचे नेतृत्व करणाऱ्याकडे जनतेचे लक्ष असते त्यामुळे नेते जसे वागतात तसे कार्यकर्ते व जनता वागते असा टोलाही डॉ. मोहन जोशी यांनी लगावला.

एकीकडे करोनाबाधितांची संख्या पुन्हा जोर धरत असताना लसीकरणाच्या पातळीवर संथगती दिसत असल्याबद्दल दोन्ही तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली. ‘ज्या प्रमाणात लसीकरण व्हायला हवे तेवढे ते होत नाही हे दुर्दैवी आहे. आरोग्य क्षेत्रातील लोकांमध्ये कमी झालेल्या लसीकरणामुळे चुकीचा संदेश गेला,’ असे डॉ. ओक म्हणाले. लसीकरणाबाबत धरसोड धोरण असता कामा नये, तसेच सर्वाना लवकरात लवकर लस उपलब्ध करून दिली पाहिजे, असे ते म्हणाले. यासाठी सरकारचे लसीकरणावरील नियंत्रण हटवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. डॉ. जोशी यांनीही लसीकरण प्रक्रियेचे विकेंद्रीकरण झाल्यास ही मोहीम वेगाने राबवता येईल, असे मत मांडले.